हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर भाजपकडून वारंवार टीका केली जात आहे. भाजप आमदार नितेश राणे यांनी टीका केल्यानंतर आता भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी मेट्रोचे कारशेड आरे कॉलनीतून हलविल्या प्रकरणावरून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे.
याबाबत आमदार भातखळकर म्हणाले आहेत कि, “आरे कॉलनीत एसआरए योजना लागू करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रो कार शेडला विरोध बोगस होता हे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे. मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र, बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी ‘एसआरए’ योजना मात्र हवी”, अशी टीका भातखळकर यांनी केली आहे.
आरे कॉलनीत SRA योजना लागू करण्याच्या ठाकरे सरकारच्या निर्णयामुळे मेट्रोकारशेडला विरोध बोगस होता हे स्पष्ट झाले आहे. आदित्य ठाकरे यांचा ढोंगी चेहराही उघड झाला आहे.
मुंबईकरांचे भले करणारी मेट्रो कारशेड नको, मात्र बिल्डरांचे उखळ पांढरे करून टक्केवारची सोय करणारी SRAयोजना मात्र हवी. pic.twitter.com/NYtPsYSwa5— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 11, 2021
आमदार भातखळकर यांनी आपल्या ट्विटर अकाउंटद्वारे व्हिडीओ शेअर केला असून त्यातून त्यांनी आरे कॉलनीतील मेट्रोच्या कारशेड हलवण्यावरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोपही केले आहेत. यावेळी भातखळकर म्हणाले कि, आपले तथाकथित पर्यावरण प्रेम दाखवत मुंबईकरांच्या हक्काच्या मेट्रोचे कारशेड आरे मधून इतरत्र हलविणाऱ्या ठाकरे सरकारने आता आरे मध्येच झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पाची घोषणा केली आहे. हे करून या सरकारने राजकारण केले आहे.
हे खूप संतापजनक असून पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे व महाविकास आघाडी सरकारचे पर्यावरण प्रेम हे पूर्णतः बोगस आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. केवळ राजकारण करायचे म्हणून मेट्रो तीनची कारशेड त्याठिकाणाहून हलवली आहे. याच्याविरोधात भाजप दाद मागणार आहे. खऱ्या अर्थ्याने आता आदित्य ठाकरे व महावसुली सरकारचा खोटा पर्यावरणवादी चेहरा पुन्हा एकदा समोर आलेला आहे, अशी गंभीर टीकाही यावेळी आमदार भातखळकर यांनी केली.