काबूल । अफगाणिस्तानात तालिबान एकापाठोपाठ एक क्षेत्र काबीज करत आहे. आता तालिबान अफगाण सरकारच्या प्रतिनिधींची हत्याही करत आहे. शुक्रवारी तालिबान्यांनी अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया अँड इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रमुख दावा खान मेनापाल यांची हत्या केली. टोलो न्यूजने सूत्रांकडून पुष्टि केली की, दावा खानला काबूलमध्ये अज्ञात बंदुकधाऱ्यांनी गोळ्या घातल्या.
टोलो न्यूजनुसार, अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया अँड इन्फॉर्मेशन सेंटरचे प्रमुख दावा खान मेनपाल यांची शुक्रवारी दुपारी पश्चिम काबूलमधील दारुल अमान रोडवर हत्या करण्यात आली. आतापर्यंत या प्रकरणी अफगाणिस्तान सरकारकडून कोणतेही स्टेटमेंट देण्यात आलेले नाही.
त्याचवेळी, तालिबानचे प्रवक्ते जबीउल्ला मुजाहिद यांनी दावा खानच्या मृत्यूबद्दल म्हटले आहे की,”दावाला त्याच्या कृत्याची शिक्षा मिळाली आहे.”
अफगाणिस्तान सरकारच्या मीडिया विभागाच्या प्रमुखांपूर्वी दावा खान 2016 ते 2020 पर्यंत उपराष्ट्रपतींचे प्रवक्ते होते. अलीकडच्या काळात ते पाकिस्तानी प्रॉक्सी वॉर (गोरिल्ला वॉर) च्या विरोधात निवेदन देत होते.
दावा खान मेनपाल दक्षिण अफगाणिस्तानच्या झाबुल प्रांताचे रहिवासी होते. त्यांनी काबूल विद्यापीठातून कायदा आणि राज्यशास्त्रात पदवी घेतली. सरकारसाठी काम करण्यापूर्वी त्यांनी रेडिओ आझादीमध्ये पत्रकार म्हणूनही काम केले होते.
तालिबानने अफगाण सुरक्षा दलांवर तसेच नागरिकांवर हल्ले तीव्र केले आहेत. गेल्या आठवड्यात तालिबानने प्रसिद्ध अफगाण विनोदी कलाकार नजर मोहम्मद आणि इतिहासकार अब्दुल्ला अतीफी यांची देखील हत्या केली. दोनच दिवसांपूर्वी तालिबानने एका मुलीला बुरखा न घातल्याबद्दल फाशी दिली.
तालिबानने ईशान्येकडील प्रांतासह अनेक जिल्हे काबीज केले आहेत. 100 पेक्षा जास्त जिल्हा केंद्रांवर तालिबानी झेंडे फडकत आहेत. रिपोर्ट सांगतात की, 34 पैकी 17 प्रांतीय राजधानींना तालिबानचा थेट धोका आहे.