औरंगाबाद – एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या 45 व्या दिवशी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकांतून एसटी धावली. दिवसभरात 84 ‘एसटी’च्या 221 फेऱ्या झाल्या. यातून साडेतीन हजार प्रवाशांनी प्रवास केला. यामुळे काही प्रमाणात प्रवाशांना दिलासा मिळाला आहे.
एसटी महामंडळाचे शासनात विलिनीकरण करावे, या मागणीसाठी अजूनही अनेक कर्मचारी कामावर परतण्यास तयार नाहीत. दुसरीकडे संघटनेने संप मिटल्याची घोषणा केल्यानंतर कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांचे प्रमाण वाढले. परिणामी, एसटीची सेवाही सुरळीत होण्यास मदत होत आहे. जिल्ह्यात बुधवारी 642 एसटी कर्मचारी कामावर हजर होते. ही संख्या गुरुवारी 683 वर पोहोचली.
काल दिवसभरात सिडको बसस्थानकातून जालना मार्गावर 10 लाल परीने 26 फेऱ्या केल्या. यातून 609 प्रवाशांनी प्रवास केला. औरंगाबाद – बीड मार्गावर 12 बसच्या 18 फेऱ्यातून 343 प्रवाशांनी प्रवास केला. मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे मार्गावर धावलेल्या 15 शिवशाही बसमधून 480 प्रवाशांनी प्रवास केला. नाशिक मार्गावर 6 शिवशाहीने 12 फेऱ्या केल्या. औरंगाबाद – कन्नड मार्गावर 3 बसने 6 फेऱ्या केल्या, त्यात 98 प्रवासी मिळाले. औरंगाबाद-सिल्लोड मार्गावर 4 बसने 8 फेऱ्या केल्या. बुलडाणा, जळगाव मार्गावर प्रत्येकी दोन तर पैठण, धुळे मार्गावर प्रत्येकी एक बस चालविण्यात आली. यासह जिल्ह्यातील अन्य सहा आगारांतूनही बसगाड्या धावल्या.