औरंगाबाद – एकीकडे कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमिक्रॉनशी झुंजण्याची तयारी सुरू असताना दुसरीकडे कोरोना महामारी सुरू झाल्यापासून तब्बल 628 दिवसानंतर पहिल्यांदाच शहरात कोरोनाची रुग्ण वाढ खुंटलेल्याचे दिसून आले. काल शहरात एकही नवीन कोरोनाचा रुग्ण आढळला नाही तसेच जिल्ह्यात एकाही मृत्यूची नोंद झाली नाही. यामुळे जिल्हावासीयांना मोठ्याप्रमाणावर दिलासा मिळाला आहे.
काल जिल्ह्यात गंगापूर मध्ये एक तर वैजापूर तालुक्यात दोन रुग्ण आढळले. शहरात कोरोनाचा पहिला रुग्ण 15 मार्च 2020 रोजी आढळला होता. तेव्हापासून दररोज कोरोनाचे रुग्ण आढळत होते. परंतु काल शुक्रवारी रुग्ण आढळले यात पहिल्यांदा खंड पडला. काल शहरात 385 आरटीपीसीआर तर 1423 चाचण्या घेण्यात आल्या.
या 1808 स्वॅबमध्ये एकही बाधित रुग्ण आढळला नाही. 67 रिपोर्ट घाटीत अहवालासाठी प्रलंबित आहेत. त्यामुळे कालचा पॉझिटिव्हिटी रेट पहिल्यांदा शून्यावर आला. तर रिकवरी रेट ही वाढून 97.72 टक्के झाला आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 83 रुग्णांवर विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.