त्रिसदस्यीय समिती गठीत केल्यानंतर तब्बल 28 तासांनंतर शोले स्टाईल आंदोलन मागे

औरंगाबाद | सिल्लोड शहरात पाण्याच्या टाकीवर चढून सुरू असलेले शोले स्टाईल आंदोलन तब्बल अठ्ठावीस तासानंतर दुसऱ्या दिवशी उपविभागीय अधिकारी यांच्या लेखी आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. नगर परिषद सिल्लोडच्या स्वच्छता व पाणीपुरवठा कामगारांच्या विविध मागण्या घेऊन शहरातील टिळक नगर जवळील पाण्याच्या टाकीवर सलग दुसऱ्या दिवशीही आंदोलन सुरू होते. काल दिवसभर प्रशासनातील अधिकाऱ्यांनी राजकीय दबावामध्ये आंदोलनकर्त्यांना सकारात्मक कोणताही प्रतिसाद न दिल्याने आंदोलनकर्त्यांनी रात्रभर थंडीमध्ये पाण्याच्या टाकीवरच ठिय्या मांडून आपले आंदोलन सुरू ठेवले होते. कदाचित पहिलेच आंदोलन असेल जे पाण्याच्या टाकीवर सलग दुसऱ्या दिवशीही सुरू होते.

या सर्व कामगारांचा तिढा सोडविण्यासाठी कमीत कमी जिल्हाधिकारी यांनी प्रकरणात उच्चस्तरीय समिती नियुक्त करून, मुख्याधिकारी सय्यद रफिक कंकर, कॉन्ट्रॅक्टर आर एस पवार व सर्व कामगार यांची सखोल चौकशी व तपास करून सविस्तर अहवाल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांच्याकडे पाठवावा. त्यामुळे प्रकरणात सत्य स्थिती व वास्तविकता समोर येईल त्यानुसार कामगारांना पुढे योग्य न्याय मागता येईल. अशी मागणी होती आंदोलनकर्त्यांनी आक्रमक पवित्रा घेतला होता की, पुढील एक तासात प्रशासनाने सहकार्य न केल्यास आमचा आंदोलनकर्ता पाण्याच्या टाकी मध्ये उतरून, पाण्यात उभे राहून पुढील आंदोलन सुरू करणार आहे. त्यामुळे प्रशासन प्रचंड हादरले व प्रकरणात उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील यांनी नगरपरिषद मधील सर्व अधिकारी, तहसीलदार व पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे यांच्यासोबत मीटिंग घेतली आणि आंदोलन कर्त्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यांना लेखी आश्वासन दिले.

त्यानुसार त्यांनी त्रिसदस्यीय समिती गठीत करून स्वतः उपविभागीय अधिकारी ब्रिजेश पाटील अध्यक्ष, डीवायएसपी सिल्लोड सदस्य व सर्व कामगारांच्या वतीने पुण्यातील प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या आणि संजीवनी सामाजिक संस्थेच्या संस्थापक अध्यक्षा विशाखा गायकवाड सदस्य मार्फत सखोल चौकशी व तपास करून 12 मार्च 2021 रोजी प्रत्यक्ष सर्वांची बैठक घेऊन अंतिम चर्चा करून, चौकशी अहवाल विभागीय आयुक्त औरंगाबाद यांना पाठवण्याचे लेखी आश्वासन दिले. त्यावर आंदोलन कर्त्याने तात्पुरते समाधान व्यक्त करून, तूर्तास आंदोलन स्थगित केले आहे. संपूर्ण जिल्ह्यात हा आंदोलन अत्यंत चर्चेचा विषय ठरलेला होता. स्वच्छता कामगार व पाणीपुरवठा कामगार यांना शेवटी न्याय मिळवून देऊ असा विश्वास महेश शंकरपेल्ली, कमलेश कटारिया, मनोज मोरेल्लु, सुनील मिरकर, विष्णू काटकर, शेख रफीक, अमोल ढाकरे, अरुण राठोड, किरण पवार, मधुकर राऊत या आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.