हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गटाच्या सुरू असलेल्या मंथन शिबिरात शुक्रवारी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्याविषयी अनेक गौप्यस्फोट केले. त्यानंतर आज शरद पवार यांनी आमदारांची तातडीने बैठक बोलवली आहे. शरद पवारांची आमदारांबरोबर ही बैठक पुण्यामध्ये पार पडणार आहे. या बैठकीमध्ये शरद पवार अजित पवारांच्या गौप्यस्फोटांवर प्रत्युत्तर देतील अशी दाट शक्यता आहे.
शरद पवार गटाच्या आजच्या बैठकीत शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शरद पवारांकडून बोलवण्यात आलेल्या तातडीच्या बैठकीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. मुख्य म्हणजे, अजित पवार यांनी केलेल्या गौप्यस्फोटांनंतर शरद पवारांनी तातडीची बैठक बोलावल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अद्याप या बैठकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येईल याबाबतची माहिती समोर आलेली नाही.
दरम्यान, अजित पवार गटाकडून सुरू असलेल्या मंथन शिबिरात, “भाजपसोबत जाण्याबाबतच्या निर्णयाची माहिती मी शरद पवार यांना दिली होती. शरद पवार यांनी मला बोलावून सांगितले, की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो” असा गौप्यस्फोट अजित पवार यांनी शरद पवार यांच्याविषयी केला आहे. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत. त्याचबरोबर, अजित पवारांच्या बंडा मागे शरद पवारांचाच हात होता का? हा प्रश्न देखील उपस्थित करण्यात आला आहे.