पुणे । लग्न झाले आणि लग्नानंतर लगेच कोरोनाचा अहवाल सकारात्मक आल्याने एक नवदांम्पत्यावर संस्थात्मक क्वारंटाईन होण्याची वेळ आली आहे. तर लग्नात उपस्थित ३५ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. या घटनेमुळे वऱ्हाडी मंडळींची आणि पाहुण्यांची चांगलीच धावपळ उडाली आहे. लागण झालेले काहीजण संस्थात्मक क्वारंटाईन झाले आहेत. जुन्नर तालुक्यातील धालेवाडी येथील एका विवाह सोहळ्यात हा प्रकार घडला आहे. हे कोरोना चाचणी अहवाल शुक्रवारी (दि. १०) रात्री उशिरा पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे ७ गावे बंद करण्यात आली आहेत.
धालेवाडी येथील एका जोडप्याचा विवाह नुकताच खानापूर येथील एक लग्न कार्यालयात पार पडला. या लग्नसोहळ्यासाठी आलेले पाहुणे, कार्यमालक, वऱ्हाडी आणि त्यानंतर नवरा- नवरी यांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने या विवाह सोहळ्याची जुन्नर तालुक्यात चांगलीच चर्चा होत आहे. विवाह सोहळ्यात संपर्कात आलेल्यांनी स्वतःहून आपापली चाचणी करून घेण्यासाठी पुढाकार घेतला. अनेकांनी स्वतःहून स्वॅब दिले. सोहळ्यात सहभागी झालेल्यांच्या संपर्कातील रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. बुधवारी (दि. ८) येथे ७ जण कोरोनाबाधित आढळले. गुरुवारी (दि. ९) ५ रुग्ण आढळले. शुक्रवारी (दि. १०) नवदाम्पत्याचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, असे धालेवाडी या एकाच गावात आजपर्यंत एकूण १४ जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. यातील बहूतांश जण विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याची चर्चा आहे.
जुन्नर तालुक्यात सध्या कोरोनाचे १४१ रुग्ण झाले असून, शुक्रवारी (दि. १०) धालेवाडी, शिरोली बुद्रुक, हिवरे बुद्रुक, चौदा नंबर, वारुळवाडी, नारायणगाव, धनगरवाडी, ओतूर, तेजेवाडी, पिंपळगाव, आर्वी, तेजेवाडी आदी ठिकाणी २० रुग्णांचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर शनिवारी (दि. ११) जुन्नर शहर (३), धनगरवाडी (१) असे चार रुग्ण पॉझिटिव्ह आढळले असून, तालुक्यात एकूण रुग्णसंख्या १४१ झाली आहे. आतापर्यंत ६९ जणांनी कोरोनावर विजय मिळविला आहे. तर औरंगपूर, पिंपळगावतर्फे आर्वी, मोकासबाग येथील प्रत्येकी एक अशा तीन रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, धालेवाडी येथील लग्नसोहळ्याची नोंद प्रशासनाने घेतली आहे.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.