सरकार झोपलंय काय? नांदेडनंतर छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नांदेडमधील (Nanded Government Hospital) एका शासकीय रुग्णालयात 24 तासात तब्बल 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेला आहे. मुख्य म्हणजे, नुकतीच नांदेड पाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमधून (Chhatrapati Sambhajinagar) देखील अशीच एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात (Ghati Hospital) गेल्या 24 तासात 10 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये 2 नवजात बाळांचा समावेश आहे. नांदेड आणि घाटी रुग्णालयात घडलेल्या या दोन्ही घटनेमुळे आरोग्य यंत्रणेविषयी अनेक प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयात 1 ऑक्टोंबरपासून 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे आधीच महाराष्ट्रातील वातावरण तापले असताना आता घाटी रुग्णालयात 10 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. घाटी रुग्णालय हे छत्रपती संभाजीनगरमधील एक मोठे आणि महत्त्वाचे रुग्णालय आहे. या रुग्णालयावर 12 ते 13 जिल्हे अवलंबून आहेत. दररोज हजारो रुग्ण याठिकाणी उपचार घेण्यासाठी येत असतात. मात्र याच रुग्णालयामध्ये मागच्या 24 तासात दहा रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या 10 रुग्णामध्ये 2 बालकांचा देखील समावेश आहे.

त्याचबरोबर घाटी रुग्णालयामध्ये ज्या रुग्णांचा मृत्यू झाला त्यांना बाहेरच्या रुग्णालयातून रेफर करण्यात आले होते अशी माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. तसेच, घाटी रुग्णालयामध्ये तब्बल पंधरा दिवस पुरेल इतका औषधांचा साठा उपलब्ध होता. अशी माहिती देखील समोर आली आहे. असे असताना देखील या रुग्णांचा मृत्यू नक्की कोणत्या कारणामुळे झाला हा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. इतकेच नव्हे तर, नांदेडच्या घटनेपाठोपाठ घाटी रुग्णालयात देखील अशीच घटना घडल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेतेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

एकीकडे सरकार मोफत उपचार देतोय असं म्हणत स्वतःचा गाजावाजा करत असताना दुसरीकडे सरकारी रुग्णालयातील स्थिती मात्र भयानक आहे. अपुरा स्टाफ, औषधांचा तुटवडा, खराब आरोग्य सुविधा या गोष्टींमुळे रुग्णांचा नाहक बळी जात आहे. त्यामुळे इतकं सगळं काही होत असताना सरकार अजूनही झोपलं आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे. नांदेड आणि छत्रपती संभाजीनगर येथील या दोन्ही घटनेनंतर सरकारला आता तरी जाग येऊन आरोग्य व्यवस्थेवर काही ठोस भूमिका सरकार घेणार का हे पाहायला हवं

दरम्यान, गेल्या काही महिन्यांपूर्वी कळव्याच्या एका रुग्णालयात एकाच रात्री तब्बल 17 रुग्णांचा मृत्यू झाल्याचr धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेला काही महिनेच उलटून गेले असताच पुन्हा एकदा नांदेडमध्ये आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण या दोन्ही घटनेमुळे तापले आहे. राजकिय वर्तुळात विरोधकांकडून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. तर सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील या घटनेविषयी संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता या सर्व प्रकरणावर शिंदे-फडणवीस सरकार नेमकी काय भूमिका घेईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

नांदेडमध्ये काय घडले?

नांदेडमधील येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय रुग्णालयामध्ये 24 तासांमध्ये 24 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या सर्व घटनेप्रकरणी मृत रुग्णांच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरले आहे. रुग्णालयाकडून संबंधित रुग्णांना योग्य उपचार न देण्यात आल्यामुळे त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप रुग्णांच्या कुटुंबीयांनी लावला आहे. मात्र रुग्णालय प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच, रुग्णांच्या मृत्यूला वेगवेगळी कारणे जबाबदार असल्याचे देखील म्हणले आहे. सध्या या सर्व घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे. तसेच  यासाठी एक समितीही नेमण्यात आली आहे.