हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०१४ च्या फडणवीस सरकारच्या काळातील महत्त्वाकांशी प्रकल्प असलेला मुंबई -नागपूर समृद्धी महामार्ग उदघाटनासाठी सज्ज असतानाच आता राज्य सरकार आणखी २ महामार्ग बनवण्याच्या तयारीत आहे. पुणे ते नाशिक आणि गोवा ते नागपूर असे २ नवे महामार्ग सुरु करण्याचे सरकारचे प्रयत्न आहेत.
२५० किमीचा पुणे-नाशिक औद्योगिक द्रुतगती मार्ग आणि 760 किमी नागपूर-गोवा शक्तीपीठ द्रुतगती मार्गासाठी व्यवहार्यता अभ्यास अहवाल, तपशीलवार प्रकल्प अहवाल (DPR) आणि भूसंपादन आवश्यकता यासाठी सल्लागार नियुक्त करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) आणि राज्य सरकारची राज्य पायाभूत सुविधा शाखा यांनी निविदा काढली आहे.
एमएसआरडीसीने डीपीआर पूर्ण करण्यासाठी 18 महिन्यांची मुदत दिली आहे. दोन प्रस्तावित द्रुतगती मार्गांसाठी तब्बल 80,000 कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. पुणे-नाशिक हे नवीन आणि जुने औद्योगिक क्षेत्र आणि टाऊनशिप जोडण्याचे काम करेल आणि नागपूर ते गोवा हा शक्तीपीठ महामार्ग महूर, अंबाजोगाई, औंध , नागनाथ, परळी, तुळजापूर, पंढरपूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर या प्रमुख धार्मिक केंद्रांना जोडेल.
गेल्या महिन्यात नागपुरात एका कार्यक्रमाला संबोधित करताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, नागपूर-गोवा द्रुतगती महामार्ग मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातून जाणार आहे. सध्या नागपूर ते गोवा दरम्यानचे 1016.2 किमी अंतर पार करण्यासाठी सुमारे 21 तास लागतात.
सल्लागारांनी वर्षभरात त्यांचा अहवाल आम्हांला दिल्यावर, भूसंपादन सुरू करता येईल. महामार्ग आणि द्रुतगती मार्ग बांधण्याचा आमचा अनुभव पाहता, हे ग्रीनफिल्ड प्रकल्प पाच वर्षांत तयार होतील अशी आमची अपेक्षा आहे. 80% भूसंपादन पूर्ण झाल्यानंतरच बांधकाम उपक्रम सुरू करता येतील असे पायाभूत सुविधा प्रकल्पांवरील राज्याच्या वॉर रूमचे महासंचालक राधेश्याम मोपलवार यांनी सांगितलं.