सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
देशातील कामगार संघटनांनी आज आणि उद्या पुकारलेल्या भारत बंदला चांगला प्रतिसाद मिळाला. राष्ट्रीयकृत बॅंक कर्मचारी संघटनांच्या संपामुळे काही प्रमाणात बँकिंग सेवा ठप्प झाली. केंद्रातील भाजप सरकारच्या धोरणांना विरोध करण्यासाठी संघटनांनी संपाची हाक दिली आहे तर बँकांच्या खासगीकरणाला विरोध करण्यासाठी बँक कर्मचारी संघटनांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे.
सांगली जिल्ह्यात बॅंक कर्मचारी, महावितरण, महसूल, बीएसएनएल, आशा, बांधकाम कामगार आदी संपात सहभागी झाले होते. त्यांनी आपापल्या कार्यालयासमोर तसेच जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. केंद्र सरकारच्या कामगार कर्मचारी शेतकरी आणि सर्वसामान्यांवर परिणाम करणाऱ्या धोरणाविरोधात सोमवारी, मंगळवारी केंद्रीय कामगार संघटनांच्या महासंघाने देशभर संपाची हाक दिली आहे.
त्यात ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज युनियन यासह राज्यातील महावितरण, आशा वर्कर्स, बांधकाम, नॅशनल कर्मचारी, महसूल कर्मचारी आदी सहभागी झाल्या आहेत.