सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्मारकाच्या उद्घाटनाचा वाद पेटला आहे. 2 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीकडून उद्घाटन होणार असताना, भाजपाने 27 मार्च रोजी धनगर समाज बांधवांच्या उपस्थितीत उद्घाटन पार पडणार असल्याचे जाहीर केले आहे. सांगली महापालिकेच्या माध्यमातून अहिल्यादेवी यांचा स्मारक उभारले असताना सर्वपक्षीय कार्यक्रम घेण्या ऐवजी राष्ट्रवादीने पक्षीय कार्यक्रम आयोजित केल्याचा आरोप करत भाजपाने स्वतंत्र उदघाटनाची भूमिका घेतली आहे.
महानगरपालिकेच्या माध्यमातून सांगली शहरातल्या विजयनगर या ठिकाणी पुण्यश्लोक आहिल्यादेवी यांचे स्मारक उभारण्यात आले आहे. महापालिकेच्या माध्यमातून अडीच कोटी रुपये खर्च करून या स्मारकाचं काम पूर्ण करण्यात आले आहे. आता या स्मारकाच्या उद्घाटनावरून वाद पेटला आहे. सांगली मध्ये भाजपा नेत्यांची आणि नगरसेवकांची आज सांगलीमध्ये बैठक पार पडली.
यावेळी आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सुधीर गाडगीळ, आमदार सुरेश खाडे यांच्यासह माजी आमदार आणि स्थानिक नेते व नगरसेवक उपस्थित होते. या बैठकीत 2 एप्रिल रोजीचा कार्यक्रमाला विरोध दर्शवण्यात आला. पालिकेच्या माध्यमातून सर्वपक्षीय कार्यक्रम आयोजित करून सर्व पक्षाच्या नेत्यांना आमंत्रित करणे गरजेचे होते, पण केवळ राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या हस्ते उद्घाटन पार पडण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे मत अनेकांनी व्यक्त करत 2 एप्रिल रोजी शरद पवारांच्या उपस्थित उद्घाटन होण्याआधी 27 मार्च रोजी धनगर समाज बांधवांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन करण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.