अहिल्यादेवी पुतळा वादात होळकर वंशजांची उडी; पवारांवर टीका करत लिहिलं छत्रपती संभाजीराजेंना पत्र

Sharad pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

इंदूर । जेजुरी गडावरील राजमाता अहिल्या देवी यांच्या पुतळ्याचे शनिवारी शरद पवार यांच्या हस्ते अनावरण होणार होते. मात्र, अहिल्यादेवींच्या पुतळ्याला शरद पवार यांच्यासारख्या भ्रष्टाचारी नेत्याचे हात लागता कामा नये, असे सांगत भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी आजच जेजुरी गडावर जाऊन या पुतळ्याचे अनावरण केले. त्यामुळे यावरुन मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. आता या वादात अहिल्यादेवी होळकर यांच्या वंशजांची प्रतिक्रियाही समोर आली आहे. इंदूरच्या होळकर घराण्यातील भूषणसिंहराजे होळकर यांनी युवराज संभाजीराजे छत्रपती यांना पत्र लिहित शरद पवार (Sharad Pawar) यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे.

या पत्रामध्ये होळकर म्हणतात की, होळकर घराणे आणि छत्रपती घराण्याचे संबंध अनेक पिढ्यांपासूनचे आहेत. दोन्ही घराण्यांनी समाजहितासाठी काम करून लोकमान्यता मिळवली आहे. आपला पूर्ण सन्मान ठेवून आपणास एक बाब निदर्शनास आणून द्यायची आहे. जी आपल्यापासून मुद्दामहून लपवली गेली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण बहुजन समाजाला एकत्र करून स्वराज्य उभारले. नंतरच्या काळात छत्रपती घराणे व होळकर घराणे यांनी सोयरिकही केल. बहुजन समाज एक होऊन राष्ट्रीयत्वाची भावना जागृत व्हावी हा त्यामागचा हेतू होता.

परंतु आता होळकर घराण्याच्या समृद्ध सामाजिक कार्याचा उपयोच करून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न शरद पवार यांच्या माध्यमातून होत आहे. समाजाचे अनेक प्रश्न असताना फक्त समाजामध्ये तेढ निर्माण करून आपला हेतू साध्य करणे हा त्यांचा उद्देश आहे. याचाच एक भाग म्हणून कथित विदेशी मूळचे होळकर ज्यांना येथील तत्कालिन सरकार आणि समाजाने नाकारले. आपले आजोबा श्रीमंत छत्रपती शहाजी महाराज ज्यांच्याविरोधात होते. अशा व्यक्तींच्या उपस्थितीत जेजुरी येथे कार्यक्रम घेत आहेत हा माँसाहेबांच्या कार्याचा अवमान आहे, अशी समस्त बहुजन समाजाची भावना आहे. होळकर घराण्याच्या परंपरेवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकामध्ये त्यामुळे अस्वस्थता आहे, अशा व्यक्तींना महाराष्ट्रात जेजुरी गडावर पुतळा अनावरणाचे आमंत्रण देऊन चुकीचा संदेश देण्याचे आणि बहुजन समाजात फूट पाडण्याचे काम शरद पवार यांच्याकडून होत आहे, याचा विचार आपणाकडून व्हायला हवा, असे संभाजी राजे यांना लिहिलेल्या या पत्रात होळकर कुटुंबीयांनी म्हटले आहे.

शरद पवार यांनी पेरलेल्या घाणेरड्या राजकारणाची मुळं महाराष्ट्रात रुजत असतील तर त्याचे दीर्घकालीन परिणाम हे समाजाला भोगावे लागतील. याची आपणासही जाणीव असेलच. त्याऐवजी एखाद्या शहीद जवानाची वीरमाता किंवा पत्नी, शेतकरी, मेंढपाळ यांनी हे अनावरण केले असते तर तो माँसाहेबांच्या कार्याचा गौरव ठरला असता, असेही या पत्रात म्हटले आहे.

बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’.