अहमदाबाद : वृत्तसंस्था – अहमदाबादमध्ये विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या मुलीची हत्या केल्याप्रकरणी एका तरुणीला अटक करण्यात आली आहे. अहमदाबाद पोलिसांच्या क्राईम ब्रांचने 23 वर्षीय तरुणीला रविवारी अटक केली आहे. या तरुणीवर विवाहबाह्य संबंधातून जन्माला आलेल्या बाळाची हत्या करुन त्याचा मृतदेह कचऱ्याच्या पेटीत टाकल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा सगळा प्रकार गुजरातमधील अहमदाबाद जिल्ह्यातील कोचराब गावामध्ये घडली आहे. 14 फेब्रुवारी रोजी कचऱ्याच्या गाडीत प्लॅस्टिकच्या पिशवीत गुंडाळलेला नवजात अर्भकाचा मृतदेह सापडला होता. कचरा गाडीच्या ड्रायव्हरने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरु केला.
23 वर्षीय तरुणीच्या घरात पुरावे सापडले
पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीचा मार्ग शोधून 23 वर्षीय संशयित तरुणीला चौकशीसाठी ताब्यात घेतले. त्या तरुणीचे नाव शिवानी श्रीवास्तव आहे. तिच्या घराची तलाशी घेतली असता तिच्या घरात गरोदरपणाशी संबंधित काही वैद्यकीय कागदपत्रे सापडली. त्यानंतर पोलिसांनी तिला कोठडीत घेऊन कसून चौकशी केली असता तिने नवजात मुलीची हत्या केल्याची कबुली दिली.
तरुणासोबत अनैतिक संबंध
उत्तर प्रदेशातील मैनपुरीतील रहिवासी असलेली 23 वर्षीय शिवानी श्रीवास्तव काही महिन्यांपूर्वी आपल्या पतीसोबत अहमदाबादला आली होती. यादरम्यान तिचे एका तरुणासोबत अनैतिक संबंध जुळले. त्यातूनच ती गरोदर राहिली. 13 फेब्रुवारीच्या रात्री तिला प्रसुतीकळा सुरु झाल्या. पती कामावर असताना घरातच तिने मुलीला जन्म दिला. पतीला हे समजेल या भीतीने तिने मुलीची गळा दाबून हत्या केली. तिने प्लास्टिकच्या पिशवीत अर्भकाचा मृतदेह गुंडाळून ठेवला.यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी तिने तो कचऱ्याच्या गाडीत फेकला, अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी तरुणीला अटक करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.