अहमदनगर प्रतिनिधी । पहिल्या फेरीत जिल्ह्यातील बारा जागांपैकी तब्बल सात जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे. प्राथमिक फेरीचा निकाल भारतीय जनता पक्षासाठी आणि ‘युती’साठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निकालाची उत्सुकता ताणली आहे. पारनेर मतदारसंघातील राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके दुसऱ्या फेरीत १२०० मतांनी आघाडीवर आहेत. शेवगाव मतदारसंघातून ‘राष्ट्रवादी’चे प्रताप ढाकणे, अहमदनगर मतदारसंघातून राष्ट्रवादीचे संग्राम जगताप हे ६५९ मतांनी आघाडीवर आहेत. तर राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्राजक्त तनपुरे आघाडीवर आहेत. कोपरगाव मतदारसंघातून राष्ट्रवादीचे आशुतोष काळे ४०० मतांनी आघाडीवर असून शिर्डीतून ‘भाजपा’चे राधाकृष्ण विखे जवळपास चार हजार मतांनी आघाडीवर आहेत.
दरम्यान नेवासा मतदारसंघातून शंकरराव गडाख हे आघाडीवर आहेत. श्रीगोंद्यातून ‘भाजपा’चे उमेदवार बबनराव पाचपुते हे पहिल्या फेरीत ११७५ मतांनी आघाडीवर आहेत. तसेच श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे हे आघाडीवर आहेत. अकोले मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. किरण लहामटे हे दुस-या फेरीत ५५०० मतांनी आघाडीवर आहेत. तर ‘भाजपा’चे आमदार वैभव पिचड हे पिछाडीवर होते.