नांदेड प्रतिनिधी। नांदेड उत्तर मधील एमआयएम चे उमेदवार अध्यक्ष फेरोज लाला आणि नांदेड जिल्हा प्रभारी महोमद जाबेर हे काँग्रेस नेत्याच्या फार्महाऊसवर गेले होते. बिलोली येथील कॉंग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसमध्ये बंद दाराआड तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. फार्म हाऊसवरील गाड्याचे आणि एमआयएम नेत्यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यावरून एमआयएम काँग्रेसला मॅनेज असल्याचा आरोप देखील केला जात आहे. नांदेड उत्तर मधून काँग्रेसचे आमदार डी पी सावंत हे उमेदवार आहेत. आमदार सावंत हे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचे विश्वासू आहेत.
त्यांच्या विरोधात एमआयएम ने फेरोज लाला यांना उमेदवारी दिली. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फेरोज लाला काँग्रेस नेत्याच्या फार्म हाऊसवर गेल्याने विविध चर्चाना उधाण आले. बिलोलीचे माजी नगराध्यक्ष तथा अशोक चव्हाण यांचे कट्टर समर्थक संतोष कुलकर्णी यांच्या फार्म हाऊसवर एमआयएम च्या या नेत्यांची गुप्त बैठक झाल्याचा संशय आहे.
दरम्यान नांदेड मध्ये एमआयएम अशोक चव्हाण यांना मॅनेज असल्याचा अनेक वेळा आरोप झाला आहे. कॉंग्रेस नेत्यासोबत बैठक झाल्याचा आरोप फेरोज लाला यांनी फेटाळला आहे. आपण लघुशंकेसाठी त्या फार्म हाऊसवर गेल्याचे त्यांनी सांगीतले. त्या मार्गावरून मी आणि नांदेड प्रभारी महोमद जाबेर येत होतो. तेव्हा लघुशंकेसाठी त्या फार्महाऊसवर आम्ही गेलो होतो असं स्पष्टीकरण फेरोज लाला यांनी दिल.