हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । उद्योग जगतातील सूत्रांनुसार, एअर इंडियाला (Air India) 470 विमाने चालवण्यासाठी 6,500 हून अधिक वैमानिकांची गरज भासणार आहे जी येत्या काही वर्षांत एअरबस आणि बोईंगद्वारे पुरवली जाणार आहेत. फ्लीट आणि ऑपरेशन्सचा विस्तार करण्याच्या उद्देशाने एअरलाइनने एकूण 840 विमाने खरेदी करण्यासाठी ऑर्डर दिली आहेत ज्यात 370 विमाने खरेदी करण्याचा पर्यायाचा सुद्धा समावेश आहे. विशेष म्हणजे कोणत्याही एअरलाईनद्वारे केली जाणारी ही सर्वात मोठी विमान ऑर्डर आहे.
सध्या, एअर इंडियाकडे 113 विमाने असून त्यासाठी त्यांच्याकडे 1,600 वैमानिक आहेत परंतु अलीकडच्या काळात, क्रूच्या कमतरतेमुळे लांब पल्ल्याची उड्डाणे रद्द झाल्याची किंवा त्यासाठी विलंब झाल्याची अनेक उदाहरणे समोर आली आहे. एअरलाइनच्या दोन उपकंपन्या एअर इंडिया एक्स्प्रेस आणि एअरएशिया इंडिया या दोन्हीकडे मिळून 54 विमानांसह जवळपास 850 पायलट आहेत. तर विस्तारा या संयुक्त उपक्रमात ६०० हून अधिक पायलट आहेत असे एका सूत्राने पीटीआयला सांगितले.
एअर इंडिया, एअर इंडिया एक्स्प्रेस, विस्तारा आणि एअरएशिया इंडियाकडे 220 विमानांचा एकत्रित ताफा चालवण्यासाठी 3,000 पेक्षा कमी वैमानिक आहेत. सध्या एअरबस फर्म ऑर्डरमध्ये 210 A320/321 Neo/XLR आणि 40 A350-900/1000 यांचा समावेश आहे. तर बोईंग फर्म ऑर्डरमध्ये 190 737-मॅक्स, 20 787 आणि 10 777 चा समावेश आहे. एअर इंडिया ही 40 A350 विमाने खास करून लांब पल्ल्यासाठी किंवा 16 तासांपेक्षा जास्त वेळ लागणाऱ्या फ्लाइटसाठी घेत आहे.
एअरलाईनला एका विमानासाठी 15 कमांडर आणि 15 फर्स्ट ऑफिसर्स अशा 30 पायलटची आवश्यकता असेल. म्हणजेच एकट्या A350 साठी सुमारे 1,200 पायलट लागतील. एका बोईंग 777 साठी 26 पायलट आवश्यक आहेत. जर एअरलाइनने अशा 10 विमानांचा समावेश केल्यास त्यासाठी 260 पायलटची आवश्यकता असेल तर 20 बोईंग 787 विमानाला 400 वैमानिकांची आवश्यकता असेल कारण अशा प्रत्येक विमानाला 20 पायलटची गरज असते. एकत्रितपणे, 30 वाइड-बॉडी बोईंग विमाने समाविष्ट करण्यासाठी एकूण 660 वैमानिकांची आवश्यकता असेल.
प्रत्येक नॅरो-बॉडी विमानाला मग ते एअरबस A320 फॅमिली असो किंवा बोईंग 737 मॅक्स असो त्यांना 12 वैमानिकांची आवश्यकता असते, याचा अर्थ असा की ताफ्यातील अशा 400 विमानांना त्यांच्या ऑपरेशनसाठी 4,800 पेक्षा कमी वैमानिकांची आवश्यकता नसते. एअर इंडियाचे चीफ कमर्शियल ऑफिसर निपुण अग्रवाल यांनी लिंक्डइन पोस्टमध्ये म्हटले आहे की, पुढील दशकात ऑर्डरमध्ये 470 फर्म विमाने, 370 ऑप्शन एअरबस आणि बोईंगकडून खरेदी करण्याचे अधिकार यांचा समावेश आहे.
एअर इंडियाचे माजी कमर्शियल डायरेक्टर पंकज श्रीवास्तव यांच्या मते, एअर इंडिया ही विमाने काही जमिनीवर ठेवण्यासाठी नक्कीच विकत घेणार नाही. एअर इंडियाची नक्कीच काही योजना असेल. ही विमाने लगेच उद्या दाखल होणार नाहीत तर ठराविक कालावधीत ती येणार आहेत. श्रीवास्तव म्हणाले की, त्यांना खात्री आहे की एअर इंडियासह बोईंग आणि एअरबस आवश्यक संख्येने फ्लाइट सिम्युलेटर आणि पायलट प्रशिक्षण देऊन वैमानिकांचा मोठा ताफा निर्माण करू शकतील.