आशिया कप स्पर्धा रद्द; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

वृत्तसंस्था । आशिया चषक स्पर्धा रद्द करण्याची मोठी घोषणा आज बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी केली आहे. आशिया चषक रद्द झाल्यावर या गोष्टीचे नेमके काय परीणाम होतात, हे पाहावे लागेल. पण ही स्पर्धा रद्द झाली तर ते आयपीएलसाठी पथ्यावर पडणार असल्याचे म्हटले जात आहे. आशिया क्रिकेट कौन्सिलची एक महत्वाची बैठक उद्या होणार आहे. या बैठकीपूर्वीच आशिया चषक रद्द होणार असल्याचे गांगुलीने सांगितले आहे.

स्पर्धा रद्द करण्याची घोषणा करताना सौरव गांगुली म्हणाला कि, ” आशिया चषक स्पर्धा ही रद्द करण्यात येत आहे. कारण सध्याच्या घडीला कोणतीच तयारी आम्ही सुरु केलेली नाही. सरकारच्या नियमांनुसारच आम्ही क्रिकेटच्या तयारीला लागणार आहोत. त्यामुळे भारताची पहिली आंतरराष्ट्रीय मालिका कधी खेळवण्यात येईल, हे अजूनही माहिती नाही. आम्हाला खेळाडूंची सुरक्षितता सर्वात महत्वाची आहे. त्यामुळे आम्ही मैदानात उतरण्याची कोणतीही घाई करणार नाही. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि त्यानंतरच आम्ही योग्य तो निर्णय घेणार आहोत.”

आशिया चषक स्पर्धा रद्द करण्यात आली तर आयपीएलचा मार्ग मोकळा होऊ शकतो, असे बरेच जणांना वाटत आहे. त्यामुळे आता आयसीसी ट्वेन्टी-२० विश्वचषकाबद्दल नेमका काय निर्णय घेते, यावर आयपीएलचे भवितव्य अवलंबून असल्याचे म्हटले जात आहे. आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानकडे देण्यात आले होते. पण भारताने पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही स्पर्धा खेळवण्यासाठी श्रीलंकेचा पर्याय निवडण्यात येणार होता. पण श्रीलंकेच्या क्रिकेट मंडळानेही ही स्पर्धा घेण्यास उत्सुकता दाखवली नसल्याचे समजते. त्यामुळे आता ही स्पर्धा रद्द होण्याच्या मार्गावर आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”