सातारा | सातारा तालुक्यासह आसपासच्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीचा कणा असलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याने चालू गळीत हंगामात गाळपास येणाऱ्या ऊसाला एफआरपी सुत्रानुसार प्रतिटन 3 हजार 65 रुपये दर दिला असून एफआरपीपोटी 2 हजार 600 रुपये प्रतिटन पहिला हप्ता देण्यात येत आहे. गाळपास आलेल्या ऊसाला रुपये 2 हजार 600 प्रमाणे पहिल्या हप्त्याची संपूर्ण रक्कम संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खाती जमा करण्यात आल्याची माहिती कारखान्याचे मार्गदर्शक संचालक आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली आहे.
अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचा 38 वा गळीत हंगाम पूर्ण नियोजनबद्ध सुरु असून कारखान्याने गाळपास येणाऱ्या उसाला एफआरपीनुसार वेळेत पेमेंट अदा करण्याची परंपरा कायम ठेवली आहे. यंदाच्या गळीत हंगामात 7 लाख 50 हजार मे. टन. एवढ्या विक्रमी गाळपाचे उद्दिष्ट असून हा विक्रम साकारण्यासाठी कारखान्याची संपूर्ण यंत्रणा मोठ्या जोमाने कार्यरत आहे. प्रतिदिन 4300 मे.टन क्षमतेने गाळप सुरु असून 11.83 टक्के साखर उताऱ्याने आज अखेर 174320 क्विंटल रॉ शुगर उत्पादित करण्यात आली आहे. या गळीत हंगामात दि. 26 ऑक्टोबर पासून ऊस गाळपास सुरुवात झाली असून दि. 20 नोव्हेंबर अखेर 1 लाख 11 हजार 373 मे.टन उसाचे गाळप झाले आहे. या गाळप झालेल्या ऊसाला पहिला हप्ता प्रतिटन 2600 रुपये याप्रमाणे एकूण 28 कोटी 95 लाख 71 हजार 394 रुपये एवढी रक्कम संबंधित ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये दि. 30 नोव्हेंबर रोजी जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कमही लवकर आणि वेळेत अदा केली जाणार असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले आहे.
स्व. भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यातील जनतेच्या साक्षीने आणि सहकार्याने लावलेल्या अजिंक्यतारा सहकारी साखर कारखानारूपी रोपट्याचे आज भल्या मोठ्या वटवृक्षात रुपांतर झाले आहे. आज जिल्ह्यात नव्हे तर राज्यात आर्थिकदृष्ट्या एक भक्कम आणि सक्षम सहकारी संस्था म्हणून कारखान्याला ओळखले जात आहे. गाळपास येणाऱ्या उसाचे पेमेंट वेळेत अदा करणारा एकमेव कारखाना असा कीर्तिमान कारखान्याने निर्माण केला आहे. सभासद शेतकरी आणि कामगार वर्गाचे सहकार्य, संचालक मंडळाचे काटकसरीचे धोरण यामुळेच आज संस्थेचा नावलौकीक आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही उच्चतम ऊसदर देण्याची परंपरा कारखान्याने कायम ठेवली असून एफआरपीनुसार शेतकऱ्यांना वेळेत संपूर्ण पेमेंट अदा केले जाईल, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.