सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
अजित दादांनी कोण खंडणी मागतय, कोण काम अडवतंय यांची माहिती घेतली तर एक बोट पुढे तर चार बोटे सरकारकडे जातील. तेव्हा दादांनी तसेच प्रशासनाने यांची तातडीने चाैकशी करावी. यामध्ये जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई करण्यासाठी माझी काही हरकत नाही. अजित दादांनी कोणाचे नाव घेतले नव्हते, त्यामुळे आपण अंदाज बांधणे चुकीचे आहे. मात्र मी खात्रीने सांगतो, जर पोलिस यंत्रणेने कुणालाही पाठिशी न घालता तपास केला. तर त्यामध्ये अजित पवार यांचे आसपासचे कार्यकर्ते समोर येतील, असा आरोप आ. जयकुमार गोरे यांनी केला आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. जयकुमार गोरे म्हणाले, माण -खटाव तालुक्यांत सुमारे एक लाख ब्रास वाळूची तस्करी राष्ट्रवादीच्या यांनी केली आहे. मंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ वाळूची टेंडर काढावीत. प्रभाकर देशमुख यांच्यावर टीका करताना जयकुमार गोरे म्हणाले, आपण सनदी अधिकारी होता आता नाहीत, त्यामुळे आपण वाळू तस्करांना पाठीशी घालू नये. वाळू तस्करी चा प्रश्न विधानसभेत मांडून त्याविरोधात आवाज उठवणार असल्याचेही गोरे यांनी स्पष्ट केले.
माण- खटावसाठीच्या पाणी योजना रखडविण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसने केले
माण व खटाव या दुष्काळी तालुक्यांना पाणी पुरवठा योजनांची कामे रखडविण्याचे पाप राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठांपर्यंत सर्वांनीच केले आहे, असा खळबळजनक आरोप आमदार जयकुमार गोरे यांनी केला. मंत्री जयंत पाटील यांनी राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांचे न ऐकता पाणी पुरवठा योजनांची कामे मार्गी लावावीत, असेही गोरे यांनी सांगितले.