हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | महाराष्ट्राचे शिल्पकार दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची शनिवारी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्त प्रीतिसंगमावरील समाधीस्थळी अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री अजित पवार आणि खासदार सुप्रिया सुळे कराड दौऱ्यावर आहेत. सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री शिंदे कराड विमानतळावर येणार असून तेथून स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी प्रीतिसंगम येथे जाऊन अभिवादन करणार आहेत. तर उशीरा सुप्रिया सुळे व अजितदादा देखील कराडमध्ये येणार असून कराडमधील नव्या आणि जुन्या विश्रामगृहात त्यांचा मुक्काम आहे.
राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून अपात्रतेची मागणी
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार हे शिंदे फडणवीस सरकारमध्ये सामील होऊन उपमुख्यमंत्री झाले. तेव्हापासून राष्ट्रवादी शरद पवार आणि अजित पवार, असे गट पडले आहेत. तसेच अजित पवार गटाने राष्ट्रवादी काँग्रेसवर दावा देखील सांगितला आहे. एकमेकांच्या आमदार, खासदारांना अपात्र करण्याची मागणी दोन्ही गटांकडून लोकसभा आणि विधानसभा अध्यक्षांकडे करण्यात आलेली आहे. पक्षीय वाद सुरू असल्याने अजितदादा आणि सुप्रिया सुळे उद्या प्रीतिसंगमावर एकत्र येणार का? याचीच राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.
अजितदादा करणार अभिवादन
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुण्यतिथीनिमित्त शासनाचा प्रतिनिधी या नात्याने दरवर्षी मुख्यमंत्री अथवा उपमुख्यमंत्री प्रीतिसंगमावर येऊन यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करतात. उद्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार आहेत. त्यांच्यासह अजितदादांचा कराड दौरा शुक्रवारी सायंकाळी निश्चित झाला. रात्री ११ वाजता मुंबईतून विमानाने निघणार आहेत. ११.४५ वाजता कोल्हापुरात दाखल होणार आहेत. तेथून मोटारीने कराडला येणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे देखील पुण्याहून मोटारीने रात्री उशिरा कराडमध्ये दाखल होणार आहेत.
अजितदादा, सुप्रियाताई एकत्र येण्याची शक्यता कमी
दिवाळीत भाऊ विजेच्या निमित्ताने संपूर्ण पवार कुटुंबीय काटेवाडीत एकत्र आले होते. अजितदादा आणि सुप्रियाताई यांनी भाऊबीज देखील साजरी केली होती. उद्या कराडच्या प्रीतीसंगमावर ताई आणि दादा एकत्र येणार का? याची सर्वांना उत्सुकता आहे. परंतु सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित दादा उद्या सकाळी ७ वाजता प्रीतिसंगमावर जाऊन दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी अभिवादन करणार आहेत. त्यानंतर लगेच ते पुण्याकडे रवाना होणार आहेत. त्यामुळे ताई आणि दादा एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे.