महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान कधी होणार? अजित पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | राष्ट्रवादीत बंड करत अजित पवार (Ajit Pawar) यांनी शिंदे- फडणवीस सरकारशी हात मिळवणी केली. यानंतर त्यांच्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली. त्यामुळे आता अजित पवार मुख्यमंत्री देखील लवकरच होतील अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. याबाबत अजित पवार गटातील आमदारांकडून देखील वेगवेगळे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता थेट अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

मंगळवारी माध्यमांशी बोलताना अजित पवार यांना तुम्ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी कधी विराजमान होणार? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना, “मुख्यमंत्रीपदाबाबत स्वत: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यांनी नेमकं काय ठरलं आहे ते मीडियाला सांगितलं आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच आहेत. तर आम्ही दोघे उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी म्हणून काम करतोय. त्यामुळे आम्हाला मिळालेली जबाबदारी तर नीट पार पाडू द्या” असे अजित पवार म्हणाले.

यावेळी अजित पवारांना विचारण्यात आले कि उद्धव ठाकरे यांचे नेतृत्व आणि एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, या दोघांच्या नेतृत्वात काय फरक आहे? त्यावर उत्तर देताना अजितदादा म्हणाले,  प्रत्येकाचं काम आपापल्या परीने वेगळं आहे.  त्यामुळे आपण ज्यांच्याबरोबर काम करतो तिथे विश्वासाने काम करायचं अशी माझी पद्धत आहे. त्यापद्धतीने मी उद्धव ठाकरे यांच्याही बरोबर काम केलं. तसेच आता एक महिना होईल, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर काम करतोय. त्यांच्याबरोबरही तेवढ्याच विश्वासाने काम करतोय” असे देखील अजित पवारांकडून सांगण्यात आले.

यावेळी अजित पवार यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी भावी मुख्यमंत्रीचे पोस्टर लावल्यासंबंधी देखील प्रश्न विचारण्यात आला. यावर बोलताना, “कार्यकर्त्यांचं समाधान होण्याकरता त्यांनी मुख्यमंत्रीपदाचे बॅनर लावले असावेत. नाहीतर त्यांनी पोस्टर लावून समाधान मानावं. त्यांना समाधान मिळालं, ठिक आहे” असं अजित पवार म्हणाले. तसेच त्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार या प्रश्नाचे देखील उत्तर देताना, अधिवेशनच्यानंतर विस्तार होण्याची शक्यता असल्याने सांगितले.