हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्याच्या घडीला राज्यातील राजकारणात अनेक मोठमोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहेत. अशातच शनिवारी रात्री दहानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या वर्षा निवासस्थानावर काही महत्त्वाच्या घडामोडी घडल्या असल्याचेही समोर आले आहे. कारण की, शनिवारच्या रात्री दहा वाजल्यानंतर वर्षा बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांच्या पाठोपाठ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार देखील दाखल झाले. यांच्यामध्ये तब्बल एक ते दीड तास चर्चा देखील झाली. ज्यामुळे आता या भेटीविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत.
अजित पवारांची उपस्थिती
राज्यात नुकताच गणेशोत्सव सण पार पडला. या काळामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी सेलिब्रेटीपासून ते राज्याचे प्रमुख नेते गेले होते. मात्र गणेश विसर्जन होईपर्यंत उपमुख्यमंत्री अजित पवार एकनाथ शिंदे यांच्या बंगल्यावर गेले नव्हते. परंतु शनिवारी रात्री अचानक अजित पवार वर्षा बंगल्यावर दाखल झाले. त्यावेळी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे देखील वर्षा बंगल्यावर हजर होते. त्यामुळे हे नेते रात्रीच्यावेळी असे एकत्र का आले असावेत, यांच्या भेटीचे कारण काय? हा प्रश्न आता विचारला जात आहे.
मुख्य म्हणजे, राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना आणि शिवसेनेच्या अपात्र आमदारांची सुनावणी सुरू असताना या तिन्ही नेत्यांमध्ये झालेली बैठक लक्ष वेधून घेणारी ठरली आहे. अद्याप या तिन्ही नेत्यांकडून शनिवारी झालेल्या बैठकीविषयी भाष्य करण्यात आलेले नाही. त्यामुळे या बैठकीचे कारण गुलदस्त्यातच आहे. मात्र, मराठा आरक्षणाच्या मुद्द्याला धरून या तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचबरोबर, अपात्र आमदारांच्या प्रकरणासंदर्भात देखील चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून सांगितली जात आहे.
दरम्यान, गणेश उत्सवाच्या काळात एकदाही अजित पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी गेले नव्हते. मात्र शनिवारी रात्री अचानकपणे वर्षा निवासस्थानावर एकनाथ शिंदे , देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची बैठक पार पडली. ही बैठक तब्बल एक ते दीड तास सुरू होते. त्यामुळे या बैठकीत राज्यात सुरू असलेल्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे म्हटले जात आहे.