हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या नागपूरात हिवाळी अधिवेशन सुरु असून अनेक मुद्यांवरून चांगलच तापत आहे. आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सभागृहात रोकठोक भाषण करत सत्ताधाऱ्यांना गर्भित इशारा दिला तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला आहे. “बारामतीमध्ये घड्याळ बंद करण्याचा करेकट कार्यक्रम करण्याच्या वल्गना केल्या जात आहेत. पण मनात ठरविले तर त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. मी कोणाच्या बापाला घाबरत नाही,” असे पवार यांनी म्हंटले.
विधिमंडळाच्या अधिवेशनात अजित पवार यांनी काही महिन्यांपूर्वी बारामती येथे येऊन भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असून बारामती लोकसभा मतदारसंघात तगडी लढत देऊ असे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या वक्तव्याचा समाचार घेतला. यावेळी पवार म्हणाले की, “चंद्रशेखर बावनकुळे बारामतीमध्ये येऊन मला चॅलेंज देतात. घड्याळाचा करेक्ट कार्यक्रम करणार, पण संपूर्ण महाराष्ट्राला माहिती जर अजित पवार यांनी ठरवल ना तर कोणाच्या बापाला घाबरत नाही, त्यामुळे मी त्यांचा करेक्ट कार्यक्रम करेल. महाराष्ट्राला माहितीय, मी कुणाला चॅलेंज दिलं ना तर कुणाचंही ऐकत नाही. देवेंद्रजी सांगतात तसं, मी कुणाच्या बापाचं ऐकत नाही. हे पण खरं आहे. त्यांना म्हणावं थोडं दमानं. फार गाडी फास्ट चालली. वेगाने गाडी गेली तर अपघात होईल,” महाविकास आघाडी सरकारने राज्यात विकास केलाच नाही असे सांगण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप पवारांनी केला.
शिंदे-फडणवीसांच्या मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री नाही
सहा महिने मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे. मात्र, मंत्रिमंडळात एकही महिला मंत्री देण्यात आलेला नाही. मी देवेंद्रजी घरी येऊन वहिनीला सांगतो, म्हणजे ते तुम्हाला सांगतील आणि तुम्ही मनावर घ्याल. ज्यामुळे लवकरच महाराष्ट्रात महिला मंत्री होईल. तुम्ही आजच रात्री दिल्लीला फोन लावा आणि उद्याच्या उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार करा, असा टोला अजित पवार यांनी लगावला.