हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या काही महिन्यांपासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी इशारा दिला आहे. एसटी कर्मचाऱ्यांनो, ३१ मार्च पर्यंत कामावर या, नाहीतर सरकार कडून कठोर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत अजित पवार यांनी दिले आहेत. ते पुणे येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
अजित पवार म्हणाले, सध्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरु असून त्यांना एसटीची गरज आहे. अनेक विद्यार्थी अडचणीच्या भागातून येतात. त्यांना दुसरं वाहन परवडत नाही, त्यामुळे एसटी कामगारांना विनंती आहे की त्यांनी कामावर परतावं. जे निलंबित झालेत, ज्यांच्यावर कारवाई केली त्यांना पुन्हा कामावर रुजू करण्याची संधी दिली आहे. 31 मार्च पर्यंत कुणाचं न ऐकता, एसटीत रुजू व्हावं. आणि आपलं आपलं काम सुरू करावं. 31 मार्चपर्यंत नाही ऐकलं तर स्पष्ट सांगतो जे येणार नाही, त्यांच्याबद्दल कठोर भूमिका घेतली जाईल. मग मात्रं त्यांना वेगळी संधी मिळणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला आहे
ते पुढे म्हणाले, परिवहन मंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचाऱ्यांबद्दल समजूतदारपणे भूमिका घेतली. कामगारांची पगारवाढ केली आहे. एवढंच नव्हे तर त्यांना जवळपास सातव्या वेतन आयोगाच्या जवळपास नेलं आहे.कामगारांना 10 तारखेपर्यंत पगार देण्याची जबाबादारीही सरकारने घेतली आहे. त्यामुळे कामगारांनी आता कामावर रूजू व्हावं, असं आवाहन अजित पवार यांनी केलं आहे