हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. या सगळ्यात शिंदे गटाला जितक्या जागा देण्यात येतील तितक्या आम्हाला देखील देण्यात याव्यात अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे. आता अजित पवार गटाने केलेली ही मागणी बरोबर असल्याचे नेते छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. त्यामुळे आता, जागा वाटपासंदर्भात भाजप समोर मोठे आवाहन उभे राहिले आहे.
जागावाटपासंदर्भात छगन भुजबळ म्हणाले की, “अजित पवार हे आमच्या पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांनी जागा वाटपाबाबत त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे. जवळपास जेवढे शिंदे गटाते आमदार आले आहेत तेवढेच अजित पवार गटाचे आमदार देखील आले आहेत. त्यामुळे सारासार विचार करता त्यांच्या प्रमाणेच आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, तसेच असं मत मांडलं तर ते बरोबरच आहे.”
दरम्यान, अद्याप तारीख ठरलेली नाही. संसदेचा आणि विधानसभेचे अधिवेशन चालू होत, त्यामुळे भाजपसोबत कोणतीही चर्चा झाली नाही. मात्र आता जानेवारी महिन्यात आमच्या तीनही पक्षाच्या बैठका होणार आहेत. या बैठकीमध्ये भाजपच्या पक्षश्रेष्ठींसोबत आमची आणि एकनाथ शिंदे यांची जागावाटपाबात चर्चा होणार असल्याची माहिती अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल यांनी दिली आहे. त्यामुळे आता अजित पवार गट जागा वाटपाविषयी आपल्या भूमिकांवर ठाम असल्याचे स्पष्ट झाले आहे. यात आता भाजप दोन्ही गटाचे मन राखत जागांची वाटणी कशी करेल हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.