हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाच्या भाजप, शिवसेना, काँग्रेस, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी बळकटीसाठी सुरुवात केली आहे. महिन्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये २ जुलै रोजी भूंकप झाला. काका शरद पवार यांची साथ सोडत पुतण्या अजित पवार नऊ जणांना सोबत घेऊन शिवसेना-भाजप सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर पक्ष सावरण्यासाठी काका स्वत: शरद पवार मैदानात उतरले. काकानंतर आता पुतणे अजित पवार देखील सक्रीय झाले आहेत. त्यांनी पश्चिम महाराष्ट्रातील आपला गट मजबूत करण्यासाठी पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी स्वत:कडे घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात शरद पवार विरुद्ध अजित पवार असा सामना रंगणार आहे.
सातारा हा राष्ट्रवादीचा 1999 पासून बालेकिल्ला आजतागायत अबाधित राहिला आहे. पण अजित पवार यांच्या बंडानंतर सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. मात्र, दुसरीकडे राष्ट्रवादी पक्ष फोडून भाजपच्या मांडीला मांडी लावून बसलेल्या व उपमुख्यमंत्री झालेल्या अजित पवारांनी आपल्या गटाकडून आता ताकद वाढवण्यासाठी मंत्र्यांना राज्यातील जिल्हे विभागून देण्यात आले आहेत. यामध्ये अजित पवार यांनी थेट राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांच्या मतदार संघावर लक्ष केंद्रित केले आहे.
सातारा जिल्ह्याच्या राजकारणावर प्रामुख्याने खासदार शरद पवार व अजित पवार यांचा पगडा राहिला आहे. शिवाय अजित पवार यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. त्यामुळे सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या तरुण वर्गावर त्यांचा प्रभाव आहे. शरद पवार यांचा सातारा हा अत्यंत लाडका असा जिल्हा आहे. ज्यावेळी शरद पवारांनी पक्षाची स्थापना केली त्यावेळी 9 आमदार व 2 खासदार या जिल्ह्याने दिले आहेत. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जिल्ह्याने भरभरून मतदान देखील केले आहे. त्याच शरद पवार व अजित पवार यांच्यात फाटाफूट झाल्याने जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही उभी फूट पडली आहे.
अजित पवारांवर जबाबदारी काय?
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडल्यानंतर पक्षाचे दोन गट पडले आहेत. एक अजित पवार गट आणि दुसरा शरद पवार गट या दोन्ही गटात असलेल्या त्या त्या जिल्ह्यातील आमदार, खासदारांना सोबत घेत दोनही नेत्यांकडून आगामी येणाऱ्या निवडणुका लढल्या जाणार आहेत. खास करून पश्चिम महाराष्ट्रात शरद पवार यांना रोखण्याची जबाबदारी अजित पवार यांच्यावर आली आहे. आपला गट मजबूत करण्याचे काम पश्चिम महाराष्ट्रात अजित पवार करणार आहेत. त्यासाठी त्यांच्यावर पुणे, सातारा, सांगली, सोलापूर या जिल्ह्यांची जबाबदारी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चांगला मजबूत आहे. आता पक्षात दोन गट पडले असल्याने पुणे, सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यात आपल्या गटातील आमदार निवडणूक आणण्याचे आव्हान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर आहे.
कोणावर कोणती जबाबदारी?
1) अजित पवार – पुणे, सातारा, सांगली व सोलापूर
2) प्रफुल पटेल – भंडारा, गोंदिया, वर्धा, अमरावती व नागपूर
3) छगन भुजबळ – नाशिक, मुंबई शहर व मुंबई उपनगर
4) दिलीप वळसे पाटील – अकोला, वाशीम, छत्रपती संभाजीनगर व बुलढाणा
5) हसन मुश्रीफ – कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि अहमदनगर
6) धनंजय मुंडे – बीड, परभणी, नांदेड, आणि जालना
7) संजय बनसोडे – हिंगोली,लातूर आणि उस्मानाबाद
8) आदिती तटकरे -रायगड, रत्नागिरी, ठाणे आणि पालघर
9) अनिल पाटील – जळगाव, धुळे आणि नंदुरबार
10) धर्मारावबाबा आत्राम – गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ
साताऱ्यात अजित पवारांना कोणा-कोणाची साथ?
उपमुख्यमंत्री अजित पवारांसोबत सातारा जिल्ह्यातून विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आमदार मकरंद पाटील, दीपक चव्हाण, नितीन पाटील यांच्यासह प्रत्येक मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तरुण पदाधिकारी व कार्यकर्ते दादांच्या गटात सहभागी झाले आहेत.
बालेकिल्ल्यात शरद पवारांसोबत ‘हे’ महत्वाचे शिलेदार
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासोबत खासदार श्रीनिवास पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे, माजी मंत्री विक्रमसिह पाटणकर यांच्यासह महत्वाचे असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने हे देखील शरद पवार यांच्यासोबत आहेत.