हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राष्ट्रवादी पक्षात बंड केल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत चर्चा रंगली आहे. अशातच आता अजित पवार यांनी देखील एक नुकतेच सुचक वक्तव्य केले आहे. बुधवारी कर्जतमध्ये निर्धार सभा पार पडली. या सभेमध्ये बोलत असताना, “आधी लोक सभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे तेच होईल” असे अजित पवार यांनी म्हटले आहे. त्यांनी केलेल्या या सूचक वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आले आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार गट जोमाने कामाला लागला आहे. त्यामुळे सध्या त्यांच्या राज्यातील वेगवेगळ्या भागात सभा पार पडत आहेत. बुधवारी त्यांची निर्धार सभा कर्जतमध्ये पार पडली. या सभेमध्ये त्यांनी आपण राष्ट्रवादीतून बाहेर पडण्याचा का निर्णय घेतला याची माहिती देखील जनतेला दिली. तसेच, मुख्यमंत्री पदाबाबत मोठे विधान केले. सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, “आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल” त्यांच्या याच वक्तव्यामुळे आता सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
मराठा आरक्षणाबाबत वक्तव्य
दरम्यान, बुधवारच्या सभेत अजित पवार यांनी मराठा आरक्षणाबाबत देखील वक्तव्य केले आहे. “मराठा समाजाला वाटतं की आरक्षण मिळालं पाहिजे. धनगर समाजाला वाटतं आरक्षण मिळालं पाहिजे. यासाठीच मुख्यमंत्र्यांनी कमिटी नेमली आहे. सध्या जुन्या नोंदीची तपासणी केली जात आहे. कुणावरही अन्याय होणार नाही, याची काळजी घेतली जातेय. त्यामध्ये इतरांच्या आरक्षणाला धक्का न देता राहिलेल्यांना संधी दिली पाहिजे.” अशी भूमिका अजित पवारांनी मांडली.