हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । घरातली विरुद्ध बाहेरची. बारामतीच्या राजकारणातला सध्याचा सर्वात हाय व्होल्टेज मुद्दा. याआधी पवार बारामतीत कमी आणि महाराष्ट्राच्या प्रचारातच जास्त गुंतलेले असायचे. यंदा मात्र आख्खं पवार घराणं बारामतीत तळ ठोकून आहे. कुणी वहिनींच्या तर कुणी ताईंच्या बाजूने…महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रतिष्ठेची निवडणूक कुठली असेल तर ती बारामतीची… ‘विधानसभेला दादा तर लोकसभेला ताई’ अशा चाललेल्या लोकांच्यातील चर्चा ते विजयबापू आणि महायुतीच्या स्थानिक नेत्यांनी अजितदादांना केलेला कडवा विरोध पाहता, बारामतीत दादांचं पानिपत होणार हे फिक्स होतं. सुप्रियाताई खासदारकीच्या राजकारणात प्लसमध्ये होत्या. पण वारं फिरलं आणि अजितदादांच्या वळचणीला जाऊन बसलं. अजितदादांनी सिस्टीम कामाला लावली आणि बारामतीत फक्त आणि फक्त सूनेत्रा वहिनीच दिसू लागल्या. पन्नास वर्षाचा अनुभव असतानाही शरद पवारांना आपल्या लेकीसाठी जे करता आलं नाहीये ते अजित पवार आपल्या बायकोसाठी इतकं सहजपणे बारामतीत राजकारण कसं फिरवतायत? अजित दादांनी टाकलेल्या या हुकमी पत्त्यांमुळे सुप्रियाताई निवडणूक का हरतायत?चला जाणून घेऊयात…
बारामतीची निवडणूक (Baramati Lok Sabha 2024) वरवर पाहता नणंद विरुद्ध भावजयी अशी वाटत असली तरी ती होतेय शरद पवार विरुद्ध अजित पवार अशी. बारामतीचा खासदार कोण? यापेक्षा राष्ट्रवादीवर होल्ड कुणाचा? याचंच उत्तर बारामतीच्या निकालातून समोर येणार आहे. म्हणूनच इन मिन चार जागा मिळालेल्या अजित दादांनी (Ajit Pawar) बारामतीची जागा सर्वात प्रतिष्ठेची केलीये. स्टॅंडिंग खासदार सुप्रियाताईंना (Supriya Sule) बॅकफुटला टाकण्यासाठी त्यांनी केलेली पहिली खेळी आहे ती, जुन्या नव्या नेटवर्कचा वापर करून केलेला ॲग्रेसिव्ह प्रचार…सलग तीन टर्म सुप्रियाताई जरी बारामतीतून निवडून येत असल्या तरी जमिनीवरची बेरजेची गणित अजित पवारच करत आले. सुप्रियाताई आणि शरद पवार दिल्लीच्या राजकारणात गुंग असताना स्थानिक नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी कनेक्ट होता तो दादांचा. बारामती, इंदापूर, पुरंदर या पट्ट्यातून सुप्रिया ताईंना जे लीड मिळायचं त्यामागे दादांचीच ताकद असायची. मात्र आता याच बहिणीच्या विरोधात आपल्या बायकोला उतरवत अजित दादांनी अग्रेसिव्ह प्रचाराला सुरुवात केलीय. बारामती, इंदापूर, पुरंदर या गेम चेंजर ठरणाऱ्या विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात प्रचार सभा घेत कार्यकर्त्यांना ऍक्टिव्ह राहायला सांगितलंय. घोंगडी बैठका घेत डोअर टू डोअर प्रचार चालूय. सोशल मीडिया सेल, महिला, युवती, शिक्षक, विद्यार्थी विंग यांच्या नवीन नियुक्त्या करून त्यांना प्रचाराचं टार्गेट देण्यात आलंय. गावपातळीवरील अनेक प्रलंबित प्रश्न पूर्ण करण्याचं आश्वासन देत त्यांना घड्याळाशी जोडण्यात येतंय. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भाजप, शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांनाही प्रचारात उतरवत जास्तीत जास्त मतदान कसं फिरेल? याची काळजी घेतली जातेय.
प्रचारासाठी रस्त्यांवरून फिरणाऱ्या गाड्या, मॅरेथॉन बैठका, सोशल मीडियावरून केली जाणारी प्रसिद्धी आणि ॲक्टिव्ह केलेले व्हाट्सअप ग्रुप या सगळ्यात सुप्रियाताईंपेक्षा सुनेत्राताईंचाच जास्त वावर दिसतोय. त्यामुळे बारामती मतदारसंघात सध्या तरी ‘सब कुछ सुनेत्राताई’ असं वातावरण तयार करण्यात दादांना यश आलंय. दादांचा प्रचार फक्त प्रचारच राहत नाहीये, तर त्याला मतांमध्ये कन्व्हर्ट करण्याचा प्लॅनही त्यामागे आहे. म्हणूनच अजितदादांच्या या ॲग्रेसिव्ह प्रचाराला सुप्रियाताई सध्या भिऊन आहेत.
दुसरी गोष्ट येते ती भाजपचा कट टू कट वापर करून घेता येणे…
बारामतीत सुप्रियाताईंचा पारंपारिक विरोधक राहिलाय तो भाजपा. ताई मतदारसंघातून सलग तीन टर्म निवडून येत असल्या तरी खडकवासला, दौंड, पुरंदर या सर्वाधिक मतदारांची संख्या असणाऱ्या विधानसभा मतदारसंघात भाजपचा बोलबाला आहे. इथून प्रत्येक टर्मला ताई पिछाडीवरच राहिल्यात. त्यामुळे राष्ट्रवादीतून फुटलेला दादा समर्थक गट अजूनही सुनेत्राताईंच्या पाठीशी आहेच, मात्र त्यासोबतच भाजपची मोठी ताकदही त्यात ऍड होणार असल्याने अजित दादांसाठी हा प्लस पॉइंट ठरणार आहे…
पण या सगळ्यात भाजपचा नेमका कसा वापर करून घ्यायचा? हे अजितदादांनी नीट कॅप्चर केल्यामुळे बारामतीचं पारड सुनेत्रा वहिनींसाठी हळूहळू जड होताना दिसतय. बावधन, महाळुंगे, हिंजवडी, सुस, उरुळी देवाची, हांडेवाडी, जांभूळवाडी आणि खडकवासला मतदारसंघाचा सगळा पट्टाच शहरी झाला आहे. इथलं बहुतांश मतदान हे भाजपाला होतं. या सगळ्या भागातून मतदान आणण्याची जबाबदारी दादांनी भाजप कार्यकर्त्यांवर सोडलं आहे. त्यासाठी लागणारं नेटवर्कही त्यांनी उभं केलंय. राष्ट्रवादी आणि भाजपचे कधीकाळी एकमेकांना खुन्नस देणारे कार्यकर्ते आता एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सुनेत्रा वहिनींसाठी प्रचार करतायत. पवार विरुद्ध पवार अशा असणाऱ्या या लढतीला मोदी विरुद्ध पवार असं स्वरूप देत भाजपच्या कार्यकर्त्यांनी शहरीपट्ट्यात केव्हाचा प्रचार सुरू केलाय. भाजपा आमदार आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी घेऊन ग्रामीण पातळीवरही भाजपच्या नेटवर्कचा कसा फायदा मिळवता येईल? याचं पक्क गणित दादांनी जुळवून आणलंय. थोडक्यात काय तर मोदींच्या इमेजची जादू वापरत भाजप कार्यकर्त्यांना ॲक्टिव्ह करण्यात अजित दादांना यश येताना दिसतय…
अजितदादा सुप्रियाताई विरोधात एक पाऊल पुढे जातायत त्याचं आणखीन एक कारण म्हणजे इमोशनल अपील आणि खटक्यावर बोट…. तसं पाहायला गेलं तर साहेबांचा पक्ष पळवला म्हणून अजितदादांच्या विरोधात मतदार संघात सुप्त लाट पाहायला मिळायला हवी होती. सुरुवातीला ती काही प्रमाणात होतीही. मात्र तिची धार बोथट करण्यात अजितदादांना यश आलं. त्यासाठी त्यांनी वापरलेलं सर्वात मोठं हत्यार आहे ते इमोशनल कार्ड…आपण वेगळा निर्णय घेतल्यानंतर पवार कुटुंबात आपल्याला एकट पाडण्यात आलंय, सगळे पवार मिळून माझ्या विरोधात प्रचार करतायेत असं म्हणून अजितदादांनी खासगीतली गोष्ट बोलून दाखवली… मुलीला निवडून दिलं आता सुनेला निवडून द्या… इथपासून ते पवार नावासमोरीलच उमेदवाराला निवडून द्या…अशा अनेक प्रकारच्या स्टेटमेंटमधून दादा मतदारांच्या काळजाला हात घालत होते. कधी आपल्या नेहमीच्या विनोदी अंगानं तर कधी भावनिक होत दादा समर्थन मिळवत होते. विशेष म्हणजे शरद पवारांनी घरातली विरुद्ध बाहेरची या अगदी मिश्किल पणे, हसत खेळत दिलेल्या उत्तराला निवडणुकीचा सेंट्रल पॉईंट बनवत दादांनी राजकारण तापवलं… साहेबांची सूनेबद्धलची मत कशी आहेत? इथपासून ते त्यांच्या पुरोगामी असण्यावरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आलं? सोशल मीडिया आणि न्यूज चॅनलवर याचा बराच किस पाडण्यात आला. अर्थात हे सगळं शरद पवारांच्या म्हणजेच सुळेंच्या विरोधात जाऊन अजित दादांना प्लस मध्ये ठेवणार होतो. सर्वात हाईप तेव्हा झाली की, शरद पवारांच्या या वक्तव्यावर सुनेत्रा वहिनींना मत विचारण्यात आलं, तेव्हा त्यांनी निशब्द होत आसवं काढली. यामुळे शरद पवारांचा हा डाव त्यांच्यावरच बूमरँग झाला…
याउलट शरद पवार बारामती इमोशनल कार्ड खेळायला जास्त महत्त्व देत नाहीयेत. सुप्रियाताईही म्हणाव्या इतपत मतदारांच्या काळजाला अपील करतील असा प्रचार करत नाहीयेत. हे सगळंच वातावरण त्यामुळे अजितदादांच्या पथ्यावर पडतंय… एक गोष्ट इथं आवर्जून सांगावी लागते म्हणजे ज्या विजय बापूंनी अजितदादांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी विषारी वक्तव्य केली होती. पवारांच्या विरोधात बंड करत पवार विरोधी मतं मिळवणार असल्याचा निर्धार केला होता. आता काहीही झालं तरी माघार नाही असा पवित्र घेणाऱ्या याच विजय बापूंची नाराजी शिंदे आणि फडणवीसांच्या मदतीने कमी करत अखेर दूर करण्यात आली. 2019 ला ज्या शिवतारेंना पाडण्यात अजित दादांनी आपली यंत्रणा कामाला लावली होती आता त्याच विजय बापूंची यंत्रणा मात्र अजित दादांना म्हणजेच सुनेत्रा वहिनींना निवडून देण्यासाठी जीवाचं रान करताना दिसतेय. अजितदादांनीही विजयबापूंचं तोंडभरून कौतुक करत त्यांच्या या नव्या भूमिकेवरही शाब्बासकीची थाप टाकली आहे.
सांगायचा मुद्दा असा की, सुप्रिया ताईंना निवडणुकीचा अनुभव असला तरी त्यामागचा खरा चेहरा हा अजितदादांचाच राहिलाय. त्यामुळे आता हेच दादा आपल्या बहिणीच्या विरोधात आपलं सारं राजकीय कसब लावून प्रचार करतायत. पवार साहेब आणि ताई या दिल्लीच्या राजकारणात असल्या तरी ग्राउंडचा कनेक्ट हा दादांचा राहिलाय. त्याच कनेक्टचा वापर करत अजितदादांनी सुप्रिया ताईंना आता घाम फोडलाय…अजितदादांनी लावलेली ही फील्डिंग पाहता खरंच सुप्रियाताईंची विकेट पडणार का? सुनेत्रा वहिनी तुतारीचा आवाज बंद करत घड्याळाची टिकटिक बारामतीत सुरूच ठेवणार का? तुमचा अंदाज काय सांगतो? आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.