कराड । गेल्या काही दिवसापासून महाविकास आघाडी सरकारमधील पक्षात धुसफूस सुरु आहे. अशात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी संवाद साधत राष्ट्रवादी काँग्रेसबाबत पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे सांगत पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांवरही त्यांनी निशाणा साधला. पटोलेंच्या वक्तव्यावरून अजितदादांनी आपल्या शैलीत त्यांना उत्तर दिले आहे. पटोलेंच्या तक्रारीला अधिक महत्व देण्याची गरज नाही. ज्यावेळी चोवीस पक्षाचे सरकार होते तेव्हा भांड्याला भांडे लागायचे आता तर तीन पक्षाचे सरकार आहे भांड्याला भांडे लागणारच, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कराडनंतर कोयनानगर येथे भेट दिली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडे तक्रार दिली आहे. वास्तविक त्यांनी त्यांच्या नेत्यांना काय सांगायचे हा त्यांचा अधिकार आहे. त्याला फार महत्व द्यायचे काम नाही. आमच्याही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात काय झाले तर आम्ही शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करतो. अशा प्रकारे तक्रारी करण्याचे काम हे चालतच असते. त्याला फारसे महत्व देण्याची गरज नाही.
शेवटी टाळी एकाच हाताने वाजत नाही, दोन्ही हाताने वाजते – पवार
यावेळी अजित पवार यांनी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांबाबत एक महत्वाचे विधान केले. यावेळी ते म्हणाले की, आज सर्वांनी देशाचा, राज्याचा विकासाचा विचार केला पाहिजे. महाराष्ट्राचा सुसंस्कृतपणा हा खर्या अर्थाने हरवत चालला आहे. आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांनी जो विचार दिला, जो आपल्याला रस्ता दाखवला. त्यांनी दाखवलेल्या त्या मार्गावरून आपण सर्वांनी चालले पाहिजे. मात्र, त्यावरून आपण भरकटत चाललो आहे. ते बरोबर नाही. शेवटी टाळी एकाच हाताने वाजत नाही. दोन्ही हाताने वाजते. उद्या कोणी काही केले तर काहींनी समंजस भूमिका घेतली पाहिजे, असे पवार यांनी म्हंटले.