हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | गेल्या 4 दिवसात राज्यात मुसळधार पावसामुळे सातारा, सांगली आणि कोल्हापूर येथे पूरस्थिती निर्माण झाली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर येथे जाऊन पूरस्थितीची पाहणी केली. दरम्यान, अलमट्टी धरणामुळे सांगली-कोल्हापूरला पूर येत नाही असे म्हणत अजित पवारांनी पूरस्थितीचे नेमकं कारण सांगितले.
कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला पुराचा धोका वाढलाय, असे म्हटले जाते. परंतू मागच्या काळात आम्ही विरोधी पक्षात होतो. त्यावेळच्या सरकारने एक समिती नेमली होती की खरोखरच अलमट्टीमुळे या दोन जिल्ह्यांना पूर येतो का, तर या समितीचा अहवाल आला, त्यामध्ये अलमट्टीमुळे पूर येतो असं काही म्हटलेलं नाही असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.
अजित पवार म्हणाले, राधानगरी, दूधगंगा, वारणा असेल, तारळी, मुरुडी अशी अनेक छोटी मोठी धरणं आहेत. या सगळ्या धरणांचं पाणी कृष्णा, कोयना, पंचगंगा, वारणा नद्यांना जातं. ते पाणी खाली जातं. त्यावेळी तिथं वॉटर लेक होतं आणि त्याचा फटका नागरिकांना होतो. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून अलमट्टी धरणातील आवक आणि जावक याबाबत समन्वय ठेवला आहे असेही त्यांनी सांगितले.