सिंचन घोटाळा | न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास, चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार – अजित पवार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई | ‘सिंचन घोटाळा प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे त्यावर फार भाष्य करणार नाही अशी भुमिका घेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी ‘आपला न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास अाहे, आपण सिंचन घोटाळा प्रकरणी यापूर्वी चौकशीला संपूर्ण सहकार्य केले आहे आणि यापुढेही चौकशीला पूर्णपणे सहकार्य करीत राहणार आहोत’ असे मत व्यक्त केले. राज्यातील सिंचन घोटाळ्याला तत्कालीन जलसंपदा मंत्री अजित पवारच जबाबदार असल्याचा दावा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्राद्वारे केला आहे. त्यावर पवार यांना बुधवारी सकाळी पत्रकारांनी छेडले असता ते बोलत होते.

‘सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. त्यामुळे यावर फार भाष्य करणार नाही. याबाबत जास्त मी भाष्य करू नये असे माझ्या वकिलांनी मला सांगितले आहे. मी बोलल्याने तपास प्रक्रियेत अडचणी निर्माण होऊ शकतात तेव्हा मला याची दक्षता घेणे गरजेचे आहे.’ असे म्हणत ‘मी चौकशीला सहकार्य करत आलो आहे व यापुढे करत राहीन. सरकार त्यांचं काम करत आहे मी माझे काम करत राहीन’ अशी भुमिका मांडली.

‘सिंचन घोटाळ्यापेक्षा सध्या मराठा, धनगर आरक्षणासह दुष्काळ आदी मुद्दे माझ्यासाठी अधिज महत्त्वाचे आहेत. आता कुठे सभागृह चालू लागले आहे. राज्यातील विविध भागातून दुष्काळाची समस्या घेऊन आमदार येथे धडकले आहेत. त्यांचे म्हणणे ऐकले गेले पाहिजे अशी आम्ही विरोधकांची भूमिका आहे. त्यामुळेच मंगळवारी १० वाजेपर्यंत सभागृह चालवले’ असेही अजित पवार यांनी सांगितले. दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवारांची पाठराखण केली आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर अजित पवारांविरोधात प्रतिज्ञापत्र सादर करणे म्हणजे याचा अर्थ निवडणुकीच्या तोंडावर त्रास द्यायचा, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.

Leave a Comment