हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात शिंदे- फडणवीस यांच्याकडून मंत्रिमंडळाचा विस्तार केला जात नसल्याने यावरून राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी निशाणा साधला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोलाही लगावला. “एकनाथ शिंदे आमच्यासोबत होते तेव्हा चांगले होते आता जरा काम बिघडलं आहे. जे ४० लोक यांच्यासोबत गेले त्यातल्या सगळ्यांना सांगितलंय तुला मंत्री करतो, मंत्री करतो. मंत्रिमंडळ ४३ च्या पुढे नेता येत नाही त्यामुळे यांची अडचण होते आहे. म्हणून यांच्याकडून कदाचित मंत्रिमंडळाचाविस्तार केला जात नसावा, असे पवार यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात रांजणगाव महागणपती गावाच्या ग्रामसचिवालयाचा लोकार्पण सोहळा पार पडला. यावेळी विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, वेदांता फॉक्सकॉन जसा गेला तो आला असता तर २६ हजार कोटींचा जीएसटी महाराष्ट्राला दर वर्षाला मिळणार होता. पण आता ते होणार नाही.
जेव्हा आमचं महाविकास आघाडीचे सरकार होते. तेव्हा एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलने केली. यावेळी एसटी आंदोलनातही काही शहाणे आमदार तिथे जाऊन झोपले होते. एकजण म्हणायचा डंके की चोट पे करूंगा, डंके की चोट पे करूंगा आता डंका कुठे गेला? आता एसटी कर्मचाऱ्यांचे पगार नाहीत कोण जबाबदार आहे? असा सवाल पवार यांनी विचारला.
तांबेंच्या उमेदवारीवर गौप्यस्फोट
यावेळी अजित पवारांनी सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरून एक गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, सत्यजित तांबे हे काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे आहेत. परिणामी काँग्रेस तसेच बाळासाहेब थोरात चांगलेच अडचणीत सापडले आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघात काहीतरी वेगळं शिजतंय, असे मी अगोदरच बाळासाहेब थोरात यांना सांगितले होते, असे अजित पवार यांनी म्हंटले.