‘सारथी’ संस्थेचा कारभार आता अजित पवारांच्या हातात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई । राजकीय वादाचा विषय ठरलेल्या सारथी संस्थेचा कारभार आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वत: पाहणार आहेत. मंत्रालयात आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार आज यांनी याबाबत माहिती दिली. मराठा समाजातील तरुणांच्या प्रशिक्षणासाठी व कौशल्य विकासासाठी स्थापण्यात आलेली ‘सारथी’ संस्था बंद पाडण्याचा घाट महाविकास आघाडी सरकारनं घातला आहे, असा आरोप गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. ‘सारथी’ला सरकारकडून येणे असलेले शिष्यवृत्तीचे पैसे रखडले होते. त्यावरून मराठा संघटनांनी व भाजपचे खासदार संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक भूमिका घेतली होती.

याशिवाय ‘सारथी’चं काम पाहणारे विजय वडेट्टीवारांनाही विरोधकांसह काही संघटनांनी लक्ष्य केलं होतं. त्यामुळं त्रस्त झालेल्या वडेट्टीवारांनी मी ओबीसी असल्यामुळं मला लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला होता. तसंच, मुख्यमंत्र्यांना सांगून हा विभाग एखाद्या मराठा मंत्र्याकडं देण्याची तयारीही त्यांनी दाखवली होती. त्यावर मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करू नका, असा इशारा संभाजीराजेंनी दिला होता.

त्या पार्श्वभूमीवर ‘सारथी’चं काम अजित पवार यांच्याकडं देण्याचा निर्णय झाला. खुद्द विजय वडेट्टीवार यांनीच ही माहिती दिली. ‘सारथीचं काम यापुढं अधिक वेगवान व्हावं म्हणून मी स्वत: अजितदादांना तशी विनंती केली होती. माझ्याकडचा विभाग काढून घेतला असा गैरसमज कोणीही करून घेऊ नये. राष्ट्रवादीचे नवाब मलिक यांच्याकडं असलेल्या अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा कारभारही अजित पवार यांच्याकडं देण्यात आला आहे. त्यामुळं ह्या दोन्ही विभागाची कामं आता सुस्साट वेगानं पुढं जातील, असा विश्वास वडेट्टीवार यांनी व्यक्त केला.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”