नवी दिल्ली । सोशल मीडियाच्या जगात बऱ्याच वेळा एखाद्याची छोटीशी चूक ट्रोलर्सच्या नजरेत येते. जर ती व्यक्ती सेलिब्रिटी असेल तर ट्रोल होण्याची शक्यता जास्त वाढते. असेच काहीसे भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन सोबत घडले. ज्याला इंग्लडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडमुळे ट्रोल केले जात आहे. अझरुद्दीनच्या ट्विटमध्ये झालेली चूक लगेचच ट्रोलर्सच्या नजरेत आली. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडला दुखापतीमुळे भारताविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे आणि याबाबत अझरुद्दीनने एक ट्विट केले होते.
भारताचा माजी दिग्गज खेळाडू असलेल्या अजहरने आपल्या ट्विटमध्ये ख्रिस ब्रॉडचा उल्लेख केला, जे स्टुअर्ट ब्रॉडचे वडील आहेत. यामुळेच तो ट्रोल झाला. अजहरने ट्विट केले की ,”ख्रिस ब्रॉड आणि जिमी अँडरसनच्या दुखापतीमुळे इंग्लंडकडे आता गोलंदाजांची दुसरी फळी असेल. याचा भारताला फायदा होणार.” अजहरला इथे स्टुअर्टचा उल्लेख करायचा होता पण चुकून त्याने ख्रिस ब्रॉडचे नाव लिहिले.
अझरुद्दीनच्या या ट्विटमध्ये झालेल्या चुकीवर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींनी अझरुद्दीनची चूक दाखवताना रिप्लाय मध्ये लिहिले की,” तो स्टुअर्ट ब्रॉड आहे आणि त्याचे वडील ख्रिस ब्रॉड नाहीत.” आणखी एका चाहत्याने सांगितले की,” अझरुद्दीन अजूनही 1980 च्या दशकात अडकला आहे.” अझरने नंतर हे ट्विट डिलीट केले.
अझरुद्दीनने भारतासाठी 99 कसोटी आणि 334 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये 45.04 च्या सरासरीने 6215 धावा केल्या, तर उजव्या हाताच्या फलंदाजाने या खेळाच्या एकदिवसीय प्रकारात 9378 धावा देखील केल्या आहेत.