अकोला : हॅलो महाराष्ट्र – अकोल्यामध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना उघडकीस आली होती. या प्रकरणातील आरोपीला आज कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. या आरोपी कबड्डी प्रशिक्षकाला जन्मठेप आणि तीन लाख दहा हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. पीडित मुलींवर आरोपीनं वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानं एक मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता.
काय आहे प्रकरण?
शुद्धोधन सहदेव अंभोरे असं शिक्षा झालेल्या दोषीचं नाव आहे. आरोपी अंभोरे हा अकोला एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका शाळेत क्रीडा प्रशिक्षक म्हणून काम करत होता. दरम्यान स्पोर्ट खेळण्यासाठी येणाऱ्या मुलींना टीममधून काढून टाकण्याची धमकी देत आरोपी त्यांचं लैंगिक शोषण करत होता. मागील बऱ्याच काळापासून त्याचा हा किळसवाणा प्रकार सुरू होता. वारंवार लैंगिक अत्याचार केल्यानं एक अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती. यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. याप्रकरणी 30 जुलै 2018 रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अंभोरेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली
अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. डी. पिंपळकर यांनी या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणी सुनावणीदरम्यान सरकारी पक्षातर्फे नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली होती. न्यायालयाने भारतीय दंड संहितेच्या कलम 376 (2)(एन) आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 3, 4, 5 नुसार नराधम आरोपी अंभोरे याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच या आरोपीने अन्य एका मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी पाच वर्षांचा कारावास आणि कलम 506 नुसार दोन वर्षांचा अतिरिक्त कारावास सुनावण्यात आला आहे. तसेच न्यायालयाने आरोपीला तीन लाख 10 हजाराचा दंड देखील ठोठावला आहे.