फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकली अन् वनविभागने पट्ट्याला घामच फोडला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | सोशल मीडियावर आपल्या मित्रमंडळीत क्रेज दाखविण्याच्या उद्देशानं फेसबुकवर शिकारीची पोस्ट टाकणे चांगलेच महागात पडले आहे. दारूच्या नशेत मित्राच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या नादात पोस्ट टाकणाऱ्यास वनविभागाने थेट चाैकशी करत घामच फोडला.

याबाबत सविस्तर वृत्त असं की, मौजे चिकणवाडी (करंडी, ता. मेढा) या वस्तीतील नितीन आनंदा चिकणे यानं स्वत:च्या फेसबुक अकाऊंटला शिकारीच्या उद्देशानं पोस्ट टाकली. मुंबईवरून गावाला आलो की, आपला आवडता छंद बंदूक घेऊन शिकार करणं, वाघरी लावणं असं बेधडक लिहून फेसबुकवर टाकलं. कायतरी सापडणारच, असा अतिआत्मविश्वासही व्यक्त केला. वरून शिकार करण्याच्या ठिकाणचे फोटोही टाकले. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली आणि नितीन वनविभागाच्या रडारवर आला.

मेढा वनक्षेत्रपाल रंजनसिंह परदेशी आपल्या सहकाऱ्यांसह तातडीनं चिकणवाडी गाठली. वनविभागाचा ताफा बघून नितीनला घामच फुटला. वनविभागानं चौकशीला सुरुवात करताच नितीननं सदर पोस्ट दारूच्या नशेत मित्रांच्या नजरेत प्रतिष्ठा वाढविण्याच्या उद्देशानं टाकली असल्याचं सांगितलं. शिकारीचा उद्देश नसल्याचं त्यांनी सांगितलं. पंचा समक्ष नितीन चिकणे यांच्या घराची झडती घेतली असता कोणत्याही प्रकारचं शिजवलेलं अथवा कच्चं मांस आढळून आलं नाही. घरातील लाकडी कपाटात दोन वडिलोपार्जित जुनी वाघरी (जाळी) मिळून आल्या.

फेसबुक पोस्टमध्ये चार ठिकाणी वाघरी लावण्याचा उल्लेख केला होता. केलेल्या पाहणीत त्या ठिकाणी वाघरी लावल्याच्या खुणा दिसून आले नाहीत. नितीननं पोस्टमध्ये विशेष टिप लिहून दिमाखात लायसनवाली बंदूक असल्याचा उल्लेख पोस्टमध्ये केला होता. त्याची चौकशी केली असता, त्याचे आजोबा रामचंद्र हरिबा चिकणे यांची नावे परवाना असलेली बंदूक मेढा पोलीस स्टेशन येथे जमा केल्याचे पावती वरून स्पष्ट झाले.

नितीन चिकणेला अधिक चौकशीसाठी मेढा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे आणण्यात आलं असून पुढील तपास उपवनसंरक्षक महादेव मोहिते, सहाय्यक वनसंरक्षक सुधीर सोनवले यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल रंजन सिंह परदेशी, वनपाल आर. एस. शेख, वनरक्षक निलेश रजपुत, आर. एस. कांबळे करीत आहेत.

Leave a Comment