Saturday, March 25, 2023

NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना दिलासा; लोकल ट्रेनने प्रवासाची राहणार मुभा

- Advertisement -

मुंबई । NEET आणि JEE परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी, अशी मागणी भाजप नेते आशिष शेलार यांनी केली. आपण यासंदर्भात केंद्रीय रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना प्रश्न विचारला होता. त्यावेळी NEET आणि JEEच्या परीक्षार्थींना हॉल तिकीट दाखवून रेल्वे प्रवासाची मुभा देता येऊ शकते, असे पीयूष गोयल यांनी सांगितले. मात्र, त्यासाठी राज्य सरकारकडून रेल्वे खात्याला तसा प्रस्ताव पाठवला जाण्याची गरज आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रेल्वे खात्याला तशी विनंती करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

कोरोनाच्या संकटामुळे सध्या केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच रेल्वेने प्रवास करण्याची मुभा आहे. त्यामुळे यंदा NEET आणि JEEच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. मात्र, मुंबई महानगर परिसरातील NEET आणि JEEच्या परीक्षार्थीना ट्रेनने प्रवास करण्याची मुभा मिळाल्यास त्यांना परीक्षा केंद्रांवर वेळेवर पोहोचणे शक्य होईल. त्यामुळे राज्य सरकारने आपली जबाबदारी ओळखून या विद्यार्थ्यांसाठी रेल्वे खात्याकडे तसा प्रस्ताव पाठवावा, असे आशिष शेलार यांनी सांगितले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वीच सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर महिन्यात NEET आणि JEE ची परीक्षा घेण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार येत्या १३ सप्टेंबरला NEETची परीक्षा होणार आहे. तर JEE ची परीक्षाही सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे. या दोन्ही परीक्षांना देशभरातून अनुक्रमे ९.५३ लाख आणि १५.९७ लाख विद्यार्थी बसले आहेत. कोरोनाच्या संकटामुळे यापूर्वी दोनवेळ या परीक्षांची तारीख पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता या परीक्षा होणारच, या भूमिकेवर सरकार ठाम आहे.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News”.