उस्मानाबाद | कोरोनाला अटकाव घालण्यासाठी ठाकरे सरकारनं विकेंड लॉक डाउन आणि कडक निर्बंध घातले आहेत. मात्र याचा परिणाम अनेक छोट्या व्यावसायिकांवर होत आहे. आधीच कर्जबाजारी असल्यामुळे आणि पुन्हा आता कडक निर्बंधांमुळे दुकान बंद असल्याने उस्मानाबाद येथील एका सलून व्यवसायिकाने चिठ्ठी लिहून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.मनोज झेंडे ( रा. सांजा, ता. जि. उस्मानाबाद)असे आत्महत्या केलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.
याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद येथील सांजा इथं मनोज यांचे सलून आहे. या सलून दुकानावर ते आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. मागील वर्षी त्यांच्या एका मुलीचे लग्न झाल्याने त्यांच्यावर कर्जाचा बोजा होता. मागील वर्षीही व्यवसाय कोरोना मुळे ठप्प होता.यावर्षी देखील आता कडक निर्बंध लावले गेल्याने त्यांचे दुकान बंद आहे.त्यामुळे कर्ज कसे फेडायचे या चिंतेतून त्याने आत्महत्या केल्याचे समजते आहे.
चिठ्ठी लिहून आत्महत्या
दरम्यान आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी लिहलेली एक चिठ्ठी सापडली असून त्यात ‘सरकारने हातावरचे पोट असणाऱ्या सलून दुकानदारांना करोनाचे नियम अटीशर्थी लावून काम करण्याची परवानगी द्यावी अन्यथा नाभिक बांधवांना अर्थिक मदत करावी’, असे म्हटले आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा