हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | कोरोना विषाणूच्या दुसऱ्या लाटेतून भारत सध्या सावरत आहे. देशात कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटत असली तरी डेल्टा व्हेरिअंटचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे देशातील आरोग्य व्यवस्था सतर्क झाली आहे. देशातील नागरिकांचं लसीकरण करण्याच्या दृष्टीनं महत्त्वपूर्ण पावलं उचलली जात आहेत. देशात आतापर्यंत जवळपास 51 कोटीहून अधिक लशीचे डोस वितरीत करण्यात आले आहेत. पण डेल्टा व्हेरिअंटचा धोका लक्षात घेता भारतात राहणाऱ्या विदेशी नागरिकांचं लसीकरण करणंही गरजेचं बनलं आहे. याबाबत नुकताच केंद्रानं मोठा निर्णय घेतला आहे.
जगभरातील विविध देशांचे असंख्य नागरिक भारतात वास्तव्य करतात. त्यामुळे या नागरिकांचं लसीकरण करण्याची परवानगी केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. त्यामुळे आता परदेशातील नागरिकही भारतात लस घेऊ शकतात. विदेशी नागरिकांना आता CoWin App द्वारे लसीकरण करता येणार आहे.
खरंतर कोविन अॅपवरून लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करण्यासाठी आधार क्रमांकाची आवश्यकता होती. पण आता विदेशी नागरिकांना पासपोर्टद्वारे लसीकरणासाठी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर त्यांना उपलब्धतेनुसार स्लॉट दिला जाणार आहे.