औरंगाबाद : जिल्हा बँक निवडणुकीवरून शिवसेना नेते चंद्रकांत खैरे व शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे यांच्यात शाब्दिक वाद होत आहे. तुम्हाला खैरे कळले नाहीत या खैरे यांच्या प्रश्नावर त्यांना विचारले असता, शिवसेना कळली मग खैरे कळण्याची गरज काय ? अशा शब्दात त्यांनी खैरे यांना प्रत्युत्तर दिले.
जिल्हा बँकेची निवडणूक येत्या काळात होत आहे.त्या दृष्टीने सध्या जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघत आहे. यातच गुरुवारी शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी काँग्रेस नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली. यात कोण तो अंबादास? तो काय माझ्यापेक्षा वरिष्ठ आहे काय ? त्याला शिवसेनेची शिस्त माहित नाही. अशा शब्दात खैरे यांनी दानवेंवर टीका केली होती. याबाबत शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत दानवे यांना विचारले असता, त्यांनीही खैरे यांना प्रत्युत्तर दिले आहे. तुम्ही खैरेंना स्थानिक राजकारणात बाजूला सारत आहात काय यामुळे हा प्रकार घडतोय का ? या प्रश्नावर बोलताना मी एक साधा जिल्हाप्रमुख आहे. राज्यात असे चाळीस-पन्नास जिल्हा प्रमुख आहेत.
खैरे हे राज्याचे, देशाचे नेते आहेत. राज्यातील १३ नेत्यां पैकी ते एक आहेत. त्यांना बाजूला सारणारा मी कोण ? असेही दानवे म्हणाले. यावेळी बोलताना भाजप आमदार हरिभाऊ बागडे म्हणाले, माझ्यावरही जिल्हा बँकेतील रक्कम जनता बँकेत वळवण्याचे आरोप ठेवण्यात आले. परंतु जिल्हा बँकेची कुठलीही ठेव काढलेली नाही. राखीव निधी वर जनता बँकेने जास्ती व्याज दिले म्हणून तो त्या बँकेत ठेवला. आज घडीला ती रक्कम एक कोटी 13 लाख रुपये एवढी असल्याचे ते म्हणाले. प्रसंगी नितीन पाटील, अभिजीत देशमुख आदींची उपस्थिती होती.
त्यांनी माझ्या २५ तक्रारी केल्या
खैरे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे तक्रार करणार आहात काय ? यावर दानवे म्हणाले, खैरे यांनी माझ्या आजवर २५ तक्रारी वरिष्ठांकडे केलेल्या आहेत. परंतु मी आजवर एकही केलेली नाही, आणि करणारही नाही.
राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा