औरंगाबाद – शहरासह परिसरात औद्योगिक क्षेत्रात विदेशी गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर व्हावी यासाठी उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध आहेत. पर्यटन राजधानी औरंगाबादच्या परिसरातील औद्योगिक व पर्यटन विकासासाठी मोठा वाव आहे. यासंदर्भात चर्चा करण्यासाठी ‘ऑरा ऑफ ऑरिक’ या विदेशी गुंतवणूक व पर्यटनसंधींबाबत आज परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील नेते, अधिकाऱ्यांसह दहा देशातील राजदूत या परिषदेला उपस्थित राहणार आहेत.
दिल्ली मुंबई इंडस्ट्रिअल कॉरिडॉर (डीएमआयसी) च्या औरंगाबाद इंडस्ट्रिअल सिटी (ऑरिक) अंतर्गत शेंद्रा व बिडकीन परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाच्या पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्याला जागतिक पातळीवर प्रमोट करणे तसेच औरंगाबाद परिसरातील पर्यटनसंधींचा आढावा या परिषदेतून घेणे अपेक्षित आहे. आज शेंद्रा ऑरिकमध्ये ही परिषद होत आहे. उद्योगमंत्री सुभाष देसाई, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे प्रमुख पाहुणे असतील. उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बलदेवसिंग, एमआयडीसीचे सीईओ पी. अनबलगन, एआयटीएलचे व्यवस्थापकीय संचालक ए. एस. रंगा नायक, एनआयसीडीसीचे उपाध्यक्ष अभिषेक चौधरी, एआयटीएलचे सहव्यवस्थापकीय संचालक जितेंद्र काकुस्ते, रशियन विकास परिषदेचे सदस्य अलेक्झांडर प्रेमिनोव, यूएसआयएसपीएफच्या संचालक सुरभी वहाळ, तैवान चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष जेनिफर मखेचा, जेट्रोचे महासंचालक मुनेनोरी मस्तुंगा, वाणिज्य आयुक्त स्वीस बिझनेस हब विजय अय्यर आदी उपस्थित राहतील.
या देशांच्या राजदूतांची उपस्थिती –
चिआँग मिंग फूंग (सिंगापूर), झाक्यअस लिम (सिंगापूर), ऐना लेकवाल (स्वीडन), मरजा सिरक्का इनिंग (जर्मनी), योंग ओग किम (कोरिया), कोबी शोशानी (इस्त्राइल), अल्बटर्स विल्हेल्मस डी जोंग (नेदरलँड), अलेक्सी सुरोवत्सेव (रशिया), गोओर्गी द्रेअर (रशिया).