बीड प्रतिनिधी । एकाच किराणा दुकानातून भगर (वरी तांदूळ) खरेदी केलेल्या अंबाजोगाई तालुक्यातील एकूण १२ व्यक्तींना भगर खाल्ल्यानंतर विषबाधा झाली. सर्व बाधितांवर सध्या स्वाराती रूग्णालयात उपचार सुरू आहेत. आपेगाव, सारसा आणि देवळा या गावातील तीन कुटुंबातील व्यक्तींना विषबाधा झाली आहे.
विषबाधा झालेल्या कुटुंबाच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी या कुटुंबांतील व्यक्तींनी आपेगाव येथील एका किराणा दुकानातून भगर खरेदी केली. घरी गेल्यानंतर त्यांनी कुटुंबियांसह भगर शिजवून खाल्ली. त्यानंतर थोड्याच वेळात त्या कुटुंबातील १२ व्यक्तींना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. त्यामुळे नातेवाईक आणि इतर ग्रामस्थांनी त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रूग्णालयात दाखल केले. सर्व बाधितांवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती धोक्याबाहेर असल्याचे वैद्यकीय सुत्रांनी सांगितले.
विषबाधा झालेल्यांमध्ये पुतळाबाई नारायण पवार (६७), आबासाहेब नारायण पवार (४३), नयन आबासाहेब पवार (११), माया आबासाहेब पवार (२०), वैष्णवी आबासाहेब पवार (१८, सर्व रा. देवळा), श्रीनिवास शिवाजी शिंदे (३०), धनश्री शिवाजी शिंदे (२८), शांताबाई शिवाजी शिंदे (४३), लता संजय काळे (३५, सर्व रा. आपेगाव), मोहन पंढरी औशंक (५५), सुमन मोहन औशंक (५०), कौशल्या मोहन औशंक (३५, सर्व रा. सारसा) यांचा समावेश आहे.
ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.