नवी दिल्ली । रशिया-युक्रेनमध्ये सुमारे दीड महिन्यापासून सुरू असलेल्या युद्धामुळे आता तेलाच्या किंमतीवरूनही आता ‘क्रूड प्राइस वॉर’ सुरू झाले आहे. निर्बंधांमुळे त्रस्त झालेल्या रशियाने भारताला स्वस्त दरात कच्चे तेल खरेदी करण्याची ऑफर दिली, तर अमेरिकेने यावरून भारताला इशारा दिला आहे.
खरेतर, रशियाने भारताला सांगितले आहे की, युद्धापूर्वी कच्च्या तेलाची किंमत काहीही असली तरी ते प्रति बॅरल 35 डॉलरच्या सवलतीने क्रूड ऑइल देखील देईल. भारतालाही या संधीचा फायदा घ्यायचा होता, मात्र मधल्या काळात अमेरिकेने आपला डाव खेळला. वॉशिंग्टनच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, जर भारताने रशियाकडून निश्चित मर्यादेपेक्षा जास्त तेल खरेदी केले तर भारत अडचणीत येऊ शकेल.
रशियाचे परराष्ट्र मंत्री आज भारतात आले असून त्यांच्याशी झालेल्या चर्चेत रशियन पेमेंट सिस्टीम SPFS बाबत करार होऊ शकतो. याद्वारे भारताला रुपया-रुबलनुसार क्रूडची किंमत मोजता येणार आहे. अमेरिकेने याबाबत आधीच आक्षेप घेतला आहे.
रशियाने काय ऑफर दिली आहे ?
ब्लूमबर्गच्या रिपोर्ट्स नुसार, भारताने या वर्षी 1.5 कोटी बॅरल क्रूड खरेदीसाठी करार करावा अशी रशियाची इच्छा आहे. या अंतर्गत भारताला रशियाकडून यूरल ग्रेडचे कच्चे तेल मिळवायचे आहे. त्याची किंमत युद्धापूर्वीच्या क्रूडच्या किमतीपेक्षा प्रति बॅरल $35 कमी असेल. विशेष म्हणजे युद्ध सुरू होण्यापूर्वी क्रूडची किंमत प्रति बॅरल $80 च्या आसपास होती. मात्र, युद्ध सुरू झाल्यानंतर, त्याची किंमत प्रति बॅरल $ 139 वर पोहोचली.
अमेरिकेने काय इशारा दिला ?
अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की,” आम्ही रशियावर जे निर्बंध लादले आहेत ते कोणत्याही देशाला रशियाकडून तेल खरेदी करण्यापासून रोखत नाहीत. मात्र, हे एका मर्यादेपर्यंत आहे आणि त्यापेक्षा जास्त खरेदी केल्यास समस्या उद्भवू शकते. भारताने रशियाला रुपया किंवा डॉलरमध्ये पैसे दिले तर अमेरिकेला त्याची काहीच अडचण नाही. रशिया आणि भारत यांच्यात सुरू असलेल्या कराराची आम्हाला माहिती आहे आणि भारताने निर्बंधांच्या मर्यादेत कोणतेही पाऊल उचलावे अशी आमची इच्छा आहे. त्याचे उल्लंघन झाल्यास भारत अडचणीत येईल.
युद्धानंतर रशियाकडून तेलाची आयात वाढली
भारत रशियाकडून फारसे तेल खरेदी करत नसला आणि एकूण आयातीत रशियाचा वाटा केवळ 2-4 टक्के असला, तरी युक्रेनशी युद्ध सुरू झाल्यापासून भारताने ही संधी चांगलीच साधली आहे. खरं तर, 24 फेब्रुवारीपासून भारताने रशियाकडूनच सुमारे 1.3 कोटी बॅरल तेल खरेदी केले आहे तर गेल्या वर्षभरात रशियाकडून एकूण 1.6 कोटी बॅरल तेल आयात करण्यात आले. भारत हा जगातील तिसरा सर्वात मोठा तेल आयात करणारा देश आहे.
5 डॉलरने स्वस्त क्रूड
देशातील वाढत्या महागाईला तोंड देण्यासाठी आणि क्रूडच्या किमतींवर लगाम घालण्यासाठी अमेरिकेने आपल्या धोरणात्मक साठ्यातून दररोज 1 लाख बॅरल तेल सोडण्याचे सांगितले आहे. यानंतर, गुरुवारी क्रूडची फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $ 5 ने घसरली. ब्रेंट क्रूडची फ्युचर्स किंमत प्रति बॅरल $ 108.58 पर्यंत खाली आली आहे, तर WTI 5 टक्क्यांनी घसरून $ 102.74 प्रति बॅरलवर आली आहे.