औरंगाबाद – क्रेडिट कार्डची वार्षिक फी कमी करून देण्याचे आमिष दाखवून परप्रांतीय भामट्याने कामगाराला ऑनलाईन फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. 29 ते 31 मे 2021 दरम्यान तो घडला. या प्रकरणी क्रांती चौक पोलीस ठाण्यात आठ महिन्यांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
चित्तरंजन शिवाजीराव लोणीकर हे अदालत रोडवरील एका कंपनीत कामाला आहेत. त्यांनी एसबीआय बँकेचे क्रेडिट कार्ड घेतले आहे. गेल्या तीन ते चार वर्षांपासून ते क्रेडिट कार्ड वापरत आहेत. 18 मार्च 2021 रोजी त्यांना वार्षिक फी म्हणून पाच हजार रुपयांचे बिल देण्यात आले होते. त्यानंतर 29 मे रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास त्यांच्याशी एका भामट्याने संपर्क साधला. तो ‘तुमच्या क्रेडिट कार्डवर लावलेली वार्षिक फी कमी करून नवीन क्रूड देतो’ असे म्हणाला. त्यावर लोणीकर यांनी संमती दर्शविताच जुने कार्ड बदलून घेताना काही व्यवहार करावे लागतात, असे भामट्याने सांगितले. त्यानंतर नवीन कार्ड मिळेल व त्याला वार्षिक फी लागणार नाही, असेही भामटा म्हणाला. त्या दरम्यान भामट्याने त्यांना तीन वेळा ओटीपी पाठवून क्रमांक विचारले लोणीकर यांनी ओटीपी क्रमांक सांगताच तीन वेळा त्यांच्या खात्यातून प्रत्येकी 73 हजार व त्यावरील किरकोळ रक्कम भामट्याच्या खात्यात जमा झाली.
खात्यातील रक्कम कपात झाल्याचे मेसेज आल्यावर लोणीकर यांनी 31 मे रोजी क्रेडिट कार्डचे स्टेटमेंट पाहिले. तेव्हा खात्यातून 2 लाख 19 हजार 697 रुपये हाऊसिंग डॉट कॉम या खात्यावर जमा झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर लोणीकर यांनी पोलिसांत तक्रार दिली. चौकशीनंतर बुधवारी क्रांतीचौक पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला.