‘देवियों और सज्जनों…म्हणत अमिताभ बच्चन IFFI मध्ये भाऊक

पणजी | अभिनेता अमिताभ बच्चन यांनी बुधवारी ५० व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (IFFI) उद्घाटन केले. यावेळी बच्चन यांनी ‘देवियों और सज्जनों’ असं म्हणत आपल्या भाषणाची सुरवात करत उपस्थितांची मने जिंकली. चाहत्यांनी त्यांच्या दीर्घ आणि चढ-उतार असलेल्या आयुष्यात आणि करिअरमध्ये सोबत दिल्याबद्दल बच्चन यांनी चाहत्यांचे आभार मानले.

इफ्फी चे यंदा सुवर्ण महोत्सवी वर्ष असल्याने प्रेक्षकांमध्ये मोठा उत्साह पहायला मिळाला. अभिनेते बच्चन यांचे चाहत्यांनी स्टेजवर आनंदाने स्वागत केले. सुपरस्टार रजनीकांत, माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर आणि गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोदकुमार सावंत हे अमिताभ यांच्या सन्मानार्थ व्यासपीठावर उपस्थित होते.

बॉलिवूडमध्ये ५० वर्षे पूर्ण करणारे अमिताभ भावनिक पद्धतीने म्हणाले, माझ्या लोकांनो, मी तुमचे आभार मानू इच्छितो. जीवनातल्या प्रत्येक चढ-उतारात तूम्ही मला साथ दिलीत. मी नेहमी म्हणतो की लोकांचा मी ऋणी आहे. मी तुमची परतफेड कधीच करु शकत नाही आणि मला तसे करायचेही नाही. मला तुमचे हे प्रेम माझ्याजवळ ठेवायचे आहे. तसेच चित्रपटाच्या प्रवासाला सहकार्य करणार्‍या त्यांच्या आई-वडीलांचे स्मरण बच्चन यांनी यावेळी केले.