मुंबई | शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा आज सातवा स्मृतीदिन आहे. या पार्श्वभूमीवर अनेक दिग्गज नेत्यांसह चित्रपट सृष्टीतले कलाकार त्याच्या बाळासाहेबांसोबतच्या आठवणींना उजाळा देत आहेत . “बाळासाहेब नसते तर आज मी जिवंत नसतो” असे उद्गार अभिनेते अमिताभ बच्चन यांनी एका कार्यक्रमादरम्यान काढले. बाळासाहेबांच्या शिवसेनेच्या रुग्णवाहिकेमुळे माझे प्राण वाचल्याचा उल्लेख त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तेव्हा शिवसेनेची रुग्णवाहिका वेळेवर आली नसती तर माझी प्रकृती आणखी गंभीर झाली असती, असं अमिताभ बच्चन म्हणाले.
बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा देताना अमिताभ यांनी १९८२मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘कुली’ सिनेमातील अपघातानंतरचा किस्सा सांगितला. माझे आणि बाळासाहेबांचे कायमच जिव्हाळ्याचे संबंध होते असं सांगतानाच आम्ही एककमेकांचा आदर करायचो असं अमिताभ म्हणाले. तसेच बाळासाहेब जयावर त्यांच्या लेकीप्रमाणे प्रेम करायचे असंही अमिताभ यांनी सांगितले.
दरम्यान आज शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्मृतिस्थळावर सकाळी दहाच्या सुमारास शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे कुटुंबासह स्मृतिस्थळावर अभिवादन करण्यासाठी आले आहेत . त्याचबरोबर राज्यातीलही इतर राजकिय पक्षांचे नेते देखील स्मृतीस्थळावर शिवसेनाप्रमुखांना अभिवादन करण्यासाठी येत आहेत .