हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Balasaheb Thackeray) यांच्या गटाकडून आज अखेर आपल्या 17 उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीनुसार, यावेळी ठाकरे गटाने नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. यामध्ये ठाकरे गटाचे नेते अमोल किर्तीकर (Amol Kirtikar) यांचा देखील समावेश आहे. याच अमोल किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले आहे. यामुळे आज अमोल किर्तीकर यांना ईडीच्या चौकशीसाठी उपस्थित राहावे लागणार आहे. मुख्य म्हणजे, किर्तीकर यांना ईडीने समन्स बजावले असताना देखील त्यांना उमेदवारी देण्यात आल्यामुळे यावर महाविकास आघाडीतील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
उद्धव ठाकरे यांच्या गटाकडून अमोल किर्तीकर उमेदवार म्हणून घोषित करण्यात आले असले तरी किर्तीकर यांच्या समोरील अडचणी कमी झालेल्या नाहीत. कारण की, खिचडी वितरणात झालेल्या कथित गैरव्यवहाराप्रकरणामुळे ईडीने किर्तिकर यांना समन्स बजावले आहे. त्यामुळे आज याच प्रकरणाच्या चौकशीसाठी ईडीने किर्तिकर यांना कार्यालयात बोलावले आहे. या चौकशीदरम्यान किर्तीकर याच्या विरोधात काही पुरावे आढळून आले तर ईडीकडून कारवाई केली जाऊ शकते.
महत्वाचे म्हणजे, आता उमेदवारी जाहीर करण्यापूर्वीच ईडीने किर्तीकर यांना समन्स बजावले असताना ही ठाकरे गटाने उमेदवारी देण्याचा निर्णय कसा घेतला हा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. सध्या ठाकरे गटाच्या याच निर्णयामुळे महाविकास आघाडीत वाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण की, आता “मी खिचडी चोरचं काम करणार नाही, यासंदर्भात मी आत्ताच घोषणा करतोय” असे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
दरम्यान, अमोल किर्तीकर यांना वायव्य मुंबईतून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याच मतदारसंघातून त्यांचे वडील देखील म्हणजेच गजानन किर्तीकर खासदार आहेत. परंतु ते सध्या एकनाथ शिंदे गटाबरोबर आहेत. तर दुसऱ्या बाजूला, उमेदवारी घोषित करण्यात आलेले किर्तीकर खिचडी गैरव्यवहार प्रकरणात अडकले गेले आहेत. त्यामुळे अशा व्यक्तीला उमेदवारी कशी देण्यात आली असा प्रश्न ठाकरे गटाला विचारला जात आहे.