हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे आपणच निर्णय घेणार असं विधान उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) केल्यानंतर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. महाराष्ट्रात दोनच साहेब आहेत, एक शरद पवार (Sharad Pawar) साहेब आणि दुसरे बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) असं म्हणत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना सुनावलं आहे. तसेच स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही असा टोलाही अमोल कोल्हे यांनी अजित पवारांना लगावला. अमोल कोल्हे यांची हि टीका अजित पवारांच्या जिव्हारी लागण्याची शक्यता आहे.
अमोल कोल्हे (Amol Kolhe) म्हणाले, आपणच साहेब हे अजित पवारांचे विधान चेष्ठेने केलं असावं. राज्यात साहेब दोनच आहे. एक बाळासाहेब आणि दुसरे शरद पवार साहेब याची जाणीव अजित पवारांना असेल. फक्त पक्षाचा अध्यक्ष झालं म्हणजे साहेब होणं होत नाही. त्यासाठी स्वकर्तृत्वावर मोठं व्हावं लागतं. कोणाच्याही जीवावर मोठं होऊन चालत नाही. स्वतःच्या कर्तृत्वावर उभं राहणं असेल, संकटाच्या वेळी वादळं छातीवर घेणं असेल, संकट आलं म्हणून भूमिका बदलण्यापेक्षा संकट छातीवर झेलणं असेल, या सर्व गोष्टी करणं म्हणजे शरद पवार साहेब होणं असा अर्थ होतो. अजित पवारांना माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याने हि गोष्ट सांगण्याची गरज नाही असेही अमोल कोल्हे म्हणाले.
अजित पवार काय म्हणाले होते?
खेड येथील सभेत बोलताना अजित पवार म्हणाले होते की “उमेदवारी कोणाला द्यावी, कोणाला नाही, याबाबत वारंवार कोणत्याही व्यक्तीला विचारावं लागत नाही, कारण आता राष्ट्रवादीत आता आपणच साहेब आहोत. त्यामुळे मीच निर्णय घेणार असं म्हणत अजित पवारांनी दिलीप मोहिते पाटील यांची उमेदवारी जाहीर केली होती. तसेच दिलीप मोहितेंना तुम्ही निवडून द्या, मी त्यांना लाल दिव्याची गाडी देतो असं म्हणत थेट मंत्रिपदाचे संकेत अजित पवारांनी खेडवासीयांना दिली.