राष्ट्रवादीला मोठा धक्का!! अमोल कोल्हे खासदारकीचा राजीनामा देणार; कारणंही सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार यांच्या बंडानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच २ गट पडले आहेत. अनेक नेते द्विधामनस्थितीत असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरूर मतदारसंघाचे खासदार अमोल कोल्हे आज आपला राजीनामा देणार आहेत. आपण शरद पवारांसोबत आहोत असं अमोल कोल्हे यांनी यापूर्वीच स्पष्ट केलं होत. आज ते आपला राजीनामा शरद पवार यांच्याकडे सुपूर्द करणार आहेत. मात्र शरद पवार याबाबत काय निर्णय घेणार हे पाहावं लागेल.

खरं तर ज्या दिवशी अजित पवार यांच्या सोबत ८ मंत्र्यांचा शपथविधी पार पडला त्यावेळी अमोल कोल्हे हे राजभवनावर उपस्थित होते. मात्र या सोहळ्यानंतर त्यांनी आपल्याला शपथविधीची काही माहिती नव्हती, वेगळा कार्यक्रम आहे म्हणून इथे बोलवण्यात आलं होत असा खुलासा केला . त्यानंतर दुसऱ्याच दिवशी अमोल कोल्हे यांनी आपण शरद पवार यांच्यासोबत असल्याचे स्पष्ट केलं. आपल्या ट्विटर अकाउंट एक व्हिडिओ ट्विट करत त्यांनी आपला निर्णय जाहीर केला होता.

मात्र आता अमोल कोल्हे हे आपल्या खासदारकीचा राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. शिरूर लोकसभा मतदारसंघात लोकांनी जे मतदान केलं ते एका विचारधारेवर विश्वासावर ठेऊन केले होते. मतदारांच्या त्या विश्वासाला तडा जाऊ नये म्हणून मी माझा खासदार पदाचा राजीनामा शरद पवार साहेबांकडे देणार आहे असं अमोल कोल्हे यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलं. माझा आतला आवाज सांगतोय की मी शरद पवारसाहेबांसोबतच रहावं, असेही अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं. आज कोल्हेनी जरी राजीनामा दिला तरी शरद पवार याबाबत काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल.