त्यांनी उचलली जीभ आणि लावली…; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर मिटकरींची संतप्त प्रतिक्रिया

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आज एक विधान केले. त्यांच्या विधानानंतर राज्यपालांवर टीका होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनीही राज्यपालांच्या या वक्तव्याचा समाचार घेतला आहे. “आज पुन्हा त्यांनी आपली जीभ उचलली आणि टाळ्याला लावली. हुरळून जाऊन एखादा माणूस जसं गडकरी आणि पवारांनी आपल्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी यासाठी बेताल वक्तव्य करावं तसं त्यांनी केले आहे. राज्यपालांच्या काळ्या टोपीखालचा मेंदू हा सडका आहे,” अशी टीका मिटकरींनी केली आहे.

अमोल मिटकरी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधला. ते म्हणाले की, “महाराष्ट्राचे राज्यपाल नेहमीच वादग्रस्त वक्तव्य करण्यात पटाईत आहेत. जाणीवपूर्वक त्यांना प्रसिद्धीची हाव आहे का? असा प्रश्न निर्माण होईल अशी त्यांची वर्तणूक आहे. याआधीही त्यांनी महाराष्ट्राबाबत, मराठी माणसाबाबत, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याबाबत खालच्या पातळीचं वक्तव्य केले होते. त्यावर त्यांनी कोणतीही माफी मागितली नाही.

आज विद्यापीठाच्या झालेल्या कार्यक्रमात ते शिवाजी महाराजांबद्दल एकेरी बोलले. छत्रपती शिवाजी महाराज असे बोलण्याचे त्यांनी औदार्य दाखवले नाही. कोई गांधी को मानता है, कौई नेहरू को मानता है, कोई सुभाषचंद्र बोस को मानता है असं ते एकेरी बोलले, अशा शब्दात मिटकरींनी राज्यपालांचा समाचार घेतला.

कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?

आज औरंगाबाद येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले.